नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून असंतुष्ट नेत्यांना वगळण्यात आले आहे. यावरून जी-२३ आणि पक्षातील नेतृत्व यांच्यात सुरू असलेला अंतर्गत वाद अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पक्षाने दिग्गज नेते आणि असंतुष्टांचे नेतृत्व करणारे गुलाम नबी आझाद यांच्यासह आनंद शर्मा यांना स्टार प्रचारकांच्या यादीत सामावून घेतले नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासह नवज्योतसिंह सिद्धू आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील प्रचारात सामील करून घेतले आहे.
काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये २७ मार्चला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यात गुलाम नबी आजाद यांच्यासह जी-२३ चे दुसरे नेते हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, आनंद शर्मा यांच्यासारखे ओजस्वी वक्त्यांची नावे नाहीत.
अर्थात या यादीत राज्यसभा खासदार बिहारचे अखिलेश सिंह आणि भुपेंद्र हुड्डा यांचे सुपूत्र दीपेंद्र हुड्डा यांची नावे पक्षाने स्टार प्रचारकांमध्ये ठेवली आहेत. अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुलाम नबी आझाद यांना डच्चू देऊन काँग्रेस नेतृत्वाने कठोर भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
फटकेबाजी करणाऱ्यांचा समावेश
स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेसने भाषणांमधून फटकेबाजी करणाऱ्यांचा समावेश केला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह, अशोक गहलोत, भूपेश बघेल या विद्यमान मुख्यमंत्र्यांसह कमलनाथ, मल्लिकार्जून खरगे, जितिन प्रसाद, सचिन पायलट, अधीर रंजन चौधरी, रणदीप सुरजेवाला, बीके हरीप्रसाद, आरपीएन सिंह, पवन खेडा, सलमान खुर्शीद यांना सामावून घेतले आहे.