नाशिक – गेल्या १३ दिवसांपूर्वी स्कॉटलंडहून नाशकात आलेला युवक कोरोना बाधित झाल्याची बाब समोर आली आहे. हा युवक नोकरीनिमित्त स्कॉटलंडला गेला होता. तो पंचवटी परिसरात राहतो. ब्रिटनसह युरोपात नवा कोरोना समोर आल्याने या युवकाला नक्की कोणता कोरोना झाला आहे, याची तपासणी सुरू आहे. त्यासाठी या युवकाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसात येण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या युवकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. युवकाची आईही कोरोना बाधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
हा युवक ज्या सोसायटीत राहतो तेथे कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यापासूनच या युवकाला संसर्ग झाल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे त्याला ब्रिटनमध्ये संसर्ग झाला की सोसायटीतच याबाबत स्पष्टता झालेली नाही. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे.
महापालिकेचे आवाहन
कोरोना विषाणू मध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर विशेष सर्वेक्षण नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार असून दि.२५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडहून भारतात आलेल्या नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागात संपर्क करण्याचे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.
कोरोना विषाणू मध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विशेष सर्वेक्षण करणे बाबत सूचित केलेले आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विशेष सर्वेक्षण करण्यात येणार असून राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२० या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.जे प्रवासी भारतात येऊन २८ दिवसांपेक्षा अधिक काळ झालेला आहे ते वगळून इतर प्रत्येकाची आर टी पी सी आर चाचणी करण्याच्या सूचना दिल्या असून त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आलेले आहे.मनपाच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षण अंतर्गत नाशिक शहरात २५ नोव्हेंबर २०२० नंतर इंग्लंडहून भारतात आलेले आहेत त्यांचा शोध घेणे सुरू आहे.मात्र जे कुणी मनपा हद्दीत आलेले असतील त्यांनी स्वतःहून नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क साधून या विशेष सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.