कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांदरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान तसेच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत त्यांनी सोमवारी (८ मार्च) एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले, की जीवनात मला अनेक संधी मिळाल्या आहेत. बघूया पुढे काय होते ते. आता मी पूर्णपणे बरा असून कामाला सुरूवात करणार आहे.
कोलकातामधील ब्रिगेड मैदानात रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेला गांगुली उपस्थित राहणार असल्याचे बोललो जात होतो. परंतु ते सभेत उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसांपूर्वी बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले होते. याबाबत भाजपकडून आणि स्वतः गांगुलीकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. सौरव गांगुली यांना दोन जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली. सात जानेवारीला सौरव गांगुली यांना रुग्णालयातून सुटी मिळाली होती. परंतु २७ जानेवारीला त्यांची तब्येत पुन्हा बिघडली होती. आता ते पूर्णपणे बरे झाले असून, कामावर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.