मुंबई – वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यभरात चांगलाच संताप व्यक्त होत आहे. एका प्रामाणिक महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर डीएफओमुळे आत्महत्येची वेळ येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यामुळेच सोशल मिडीयावर आता ‘जस्टीस फॉर दीपाली’ ही मोहीम राबवली जात आहे.
मेळघाटातील गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत असलेल्या हरिसालच्या त्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) होत्या. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी आता डीएफओ विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली आहे. एकूणच राज्यभरातील वन विभागतून दीपाली यांच्या आत्महत्येविषयी हळहळ व्यक्त होत आहे. पण त्याचवेळी दीपालीला न्याय मिळावा यासाठी सोशल मिडीयावर कॅम्पेन सुरू झाले आहे. त्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस.एम. रेड्डी यांच्या भूमिकेबद्दलही संताप व्यक्त होत आहे. दीपाली यांनी त्यांच्या हरिसाल येथील निवासस्थानी सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःवर दोन गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोटमध्ये शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. त्या दोन वर्षांपासून हरिसाल येथे कार्यरत आहेत, तर पती राजेश मोहिते चिखलदरा येथे कोषागार कार्यालयात नोकरीला आहेत.
तीन पानांचे सुसाईड नोट
दीपाली चव्हाण यांनी एम.एस. रेड्डी यांच्या नावाने सुसाईड नोट लिहीले आहे. त्यात त्यांनी शिवकुमार यांच्याकडून होणाऱ्या जाचाबद्दल सविस्तर लिहीले आहे. प्रशासकीय जाच, रात्री-बेरात्री बोलावून एकटेपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणे, अश्लील शिविगाळ करणे, जाणूनबुजून जंगलात फिरविल्याने गर्भपात होणे अश्या अनेक तक्रारी दीपाली यांनी या नोटद्वारे केल्या आहेत. आपल्या आत्महत्येला शिवकुमारच पूर्णपणे जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, हीच शेवटची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.