नाशिक – सोशल मिडीयावर शेअर केल्या जाणाऱ्या पोस्ट आणि फोटो मधून खाजगी माहिती सार्वजनिक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा उत्साहाच्या भरात केलेल्या चॅलेंजमुळे घरातील एका व्यक्ती सोबत संपूर्ण कुटुंबाला त्याची झळ सहन करावी लागते. सध्या सोशल मिडीयावर नव्याने सुरु असलेल्या ‘#CoupleChallenge’ मुळे गेल्या दोन दिवसात १.५ अब्ज नेटीझन्सने आपल्या पतिपत्नीसह फोटो शेअर केले असल्याची माहिती सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. दोन वर्षपूर्वी अशाच एका चॅलेंजमुळे फोटोचा गैरवापर होत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या, त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या आप्तांचे फोटो शेअर करतांना काळजी घ्यावी व वेळीच असे चॅलेंज थांबवले गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हंटले आहे.
बरेचदा सोशलमिडीयावर चॅलेंजमध्ये सहभागी होत असतांना आपण लाईक्स आणि कमेंट्सच्या मागे धावतो. परंतु त्यातून उद्भवणारे संभाव्य धोके वेळीच ओळखून सावध होणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे सावट असतांना सायबर गुन्हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यातूनच आपल्या प्रियजनांच्या फोटोचा गैरवापर होता कामा नये याकडे लक्षण देणे अनिवार्य आहे. गेल्या दोन तीन दिवसात ‘#CoupleChallenge’च्या नावाखाली सोशलमिडीयावर १.५ अब्ज नेटीझन्सने आपले फोटो शेअर केले आहे. त्यामुळे आपले कौटुंबिक फोटो सार्वजनिक करतांना संपूर्ण काळजी घ्यावी असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबत सोशल मिडीयाद्वारे पोस्टच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.
—
ही काळजी घ्या…
सोशल मीडियावर फोटो शेअर करतांना केवळ आपल्या मित्रांनाच दिसतील याची काळजी घ्या. तसेच अज्ञात व निनावी प्रोफाईल पासून सावध रहा, कोणत्याही प्रकारे आपली खाजगी माहिती शेअर होणार नाही याची दक्षता बाळगा. तत्सम कोणत्याही प्रकारच्या चॅलेंजच्या प्रलोभनांना बळी पडू नका.
—
फोटो शेअर करतांना फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो
गेल्या दोन दिवसापासून १.५ अब्ज नेटीझन्सने ‘#CoupleChallenge’ अंतर्गत आपले फोटो शेअर केल्याची नोंद झाली आहे. असे कोणतेही फोटो शेअर करतांना फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो हे समजून घेणे आवश्यक आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका फोटो चॅलेंजद्वारे शेअर करण्यात आलेल्या फोटोचा गैरवापर होत असल्याचे सायबर सेलने उघड केले होते.
– अमर ठाकरे, सायबर तज्ज्ञ