नाशिक – गोदावरीचे प्रदूषण रोखण्यास सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे गोदावरीत विसर्जन न करता त्या दान कराव्यात, असे आवाहन विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांनी केले आहे.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती त्यावर केलेले रासायनिक रंगकाम व इतर सौंदर्यप्रसाधंनामुळे गोदावरीचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी ‘विद्यार्थी कृती समितीमार्फत गेल्या ९ वर्षापासून देव द्या, देवपण घ्या’ हा उपक्रम राबविला जात असून यंदाचे दहावे वर्ष आहे. गतवर्षी हजारो मूर्ती नाशिककरांनी देव द्या देवपण घ्या ! या उपक्रमातर्गत विद्यार्थी कृती समिती कडे सुपूर्द केल्या होत्या. समितीकडे आलेल्या गणेशमूर्ती मंगलमय व पवित्र वातावरणात नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने कृत्रिम तलावात विधिवत विसर्जित केल्या जातात. यंदा चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे सकाळी ८ ते १ या वेळेत देव द्या देवपण घ्या उपक्रमाचे कार्यकर्ते मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९४२१५६३५५५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवातील १० दिवस विद्यार्थी कृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्याचे आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करावे असे आवाहन केले आहे. नाशिकचे गोदाप्रेमी भाविक या आवाहनाला गेल्या ९ वर्षांपासून दरवर्षी भरभरून पाठिंबा देत आहेत. गेल्या ९ वर्षांपासून दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याने दिड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा गणेशोत्सव साजरा करणारे नाशिककरांचे गणेशमूर्ती भाविकांच्या घरी जाऊन देखील मूर्ती स्वीकारण्यात आल्या आहेत.
यंदाच्या १० व्या वर्षी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळेत देव द्या, देवपण घ्या! उपक्रमाचे स्वयंसेवक मास्क लावून लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून मूर्ती स्विकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गणेश भक्तांना आरती करण्याची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती पगार यांनी दिली आहे.