नवी दिल्ली – वयाच्या पाच आणि नवव्या वर्षी आपलं लैंगिक शोषण झाल्याचा दावा चित्रपट अभिनेत्री सोमी अली यांनी केला आहे. त्या १४ वर्षांच्या असताना त्यांच्यावर अत्याचार झाला होता, असाही दावा त्यांनी केला आहे. सोमी अली पाकिस्तानी अभिनेत्री आहेत. त्यांनी ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केलं होतं. आता त्यांनी अभिनयाचं क्षेत्र सोडलं असून, त्या आता स्वतःचं नो मोअर टियर्स नावाचं एनजीओ चालवतात.
या एनजीओच्या माध्यमातून सोमी अली अत्याचार झालेल्या पीडित मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषण झाल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. पिपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे. त्या ५ आणि ९ वर्षांच्या असताना त्यांचं लैंगिक शोषण झालं होतं. १४ वर्षांच्या असताना त्यांच्यावर अत्याचार झाला होता, असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं आहे.
याबाबत त्यांनी सांगितलं, मला हा खुलासा करण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. मी आता एक एनजीओ चालवत आहे. स्वतःवर झालेल्या शोषणाबद्दलचा खुलासा करू शकत नव्हते. मी १४ वर्षांपासून एनजीओ चालवत आहे. पाकिस्तानात पाच वर्षांची असताना माझं पहिलं लैंगिक शोषण झालं होतं. या तिन्ही घटना नोकराच्या खोलीत झाल्या आहेत.
माझ्या आई-वडिलांनी त्यावर कारवाई केली परंतु कोणालाही याबाबत सांगू नको असं बजावलं. आपण काहीतरी चुकीचं केलं होतं असं माझ्या डोक्यात अनेक वर्षांपासून बसलेलं होतं. असं माझ्या आई-वडिलांनी का सांगितलं होतं, असं त्या म्हणाल्या. त्यानंतर सोमी म्हणाल्या, की आई-वडील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या समजू शकत नव्हत्या. त्यानंतर वयाच्या ९ व्या आणि १४ व्या वर्षी त्यांच्यावर अत्याचार झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून मी यावर बोलणं सुरू केलं आहे. मी १४ वर्षांपासून एनजीओ चालवत असून स्वतःबद्दल बोलूच शकत नव्हते.