ट्रॅव्हल कंपनी ते कॅब सेवा
आयुष्यातल्या एका प्रवासानं त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि थेट ओला कॅब्जचा जन्म झाला. कसं झालं हे सगळं. भारतासह अनेक देशांमध्ये या सेवेचा विस्तार कसा झाला आणि त्याचे संस्थापक कोण आहेत, या यशस्वी स्टार्टअपचा वेध घेणारा हा लेख….
– प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आहेत)
आयुष्यात येणारे कटू अनुभव आणि अडचणी याबद्दल कुढत आणि रडत बसण्यापेक्षा त्यातून विधायक असा मार्ग काढून आपली प्रगती कशी करून घेता येईल याबद्दलचा आदर्श घालून देणारा आहे भाविष अग्रवाल.
लुधियाना शहरात जन्मलेल्या या तरुणाने २००८ साली आयआयटी बॉम्बे येथून बी टेकचे शिक्षण पूर्ण केले. कम्प्युटर क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीत त्याची इंटर्नशिपसाठी निवड झाली. इंटर्नशिप संपल्यावर त्याच कंपनीत असिस्टंट रिसर्चर म्हणून त्याला नोकरीही मिळाली. आयटी क्षेत्रात मुळातच रुची असल्याकारणाने तो अतिशय उत्तम काम करु लागला. त्याला नव-नवीन प्रोजेक्ट मिळत होते. इतकंच काय पण कंपनीसाठी काम करत असताना त्याने स्वतःचा टेक्नॉलॉजीशी संबंधित ब्लॉगही ‘देसीटेक’ या नावाने सुरू केला. आपली बुद्धिमत्ता आणि संशोधक वृत्ती याच्या जोरावर त्याने मायक्रोसॉफ्टमध्ये असतानाच आपल्या नावावर दोन पेटंट्स रजिस्टर केले आणि अंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये तीन शोधनिबंध प्रसिद्ध केले.
आपल्या हुशारीच्या जोरावर आपण एका परदेशी कंपनीसाठी काम करत आहोत आणि त्याचाच फायदा करून देत आहोत, अशी खंत त्याला सतत वाटायची. म्हणूनच साधारण दोन वर्षाहून अधिक काळ या कंपनीत काम केल्यानंतर त्याने कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. इतकी चांगली बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून व्यवसाय करावा, ही कल्पना भाविषचे आई-वडील नरेश कुमार व उषा अग्रवाल यांना फारशी पटली नव्हती. सहाजिकच कुणाच्याही आई-वडिलांची प्रतिक्रीया अशीच असेल. तरीही स्वतःच्या हिमतीवर त्याने व्यवसाय करायचं ठरवलं.
आयटी आणि वेबसाईट डेव्हलपमेंट यात तरबेज असलेल्या भाविषने स्वतःची ऑनलाइन टूर्स अँड ट्रॅव्हल्सची कंपनी सुरू केली. या कंपनीमार्फत तो ऑनलाइन शॉर्ट टूर्स बुकिंग करुन देत असे. आपल्या मेहनत व चिकाटीच्या जोरावर भाविषचा हा व्यवसाय हळूहळू जोर धरू लागला. व्यवसायाच्या निमित्ताने भविषला अनेक शहरांमध्ये प्रवास करावा लागत असे. आणि अशाच एका प्रवासात जे घडलं त्याने भाविषच भविष्यच बदलून टाकलं.
व्यवसायानिमित्त भाविषला बंगळुरू ते बंदीपूर जायचे होते. त्यासाठी त्याने एक टॅक्सी बुक केली आणि प्रवास सुरु झाला. मध्यरात्रीची वेळ, साधारण अर्धा रस्ता कापल्यानंतर ड्रायव्हरने अचानक गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि ठरलेल्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त पैसे मागू लागला. वाढीव भाडे देण्यास भाविषने नकार दिल्यावर ड्रायव्हरने भाविषशी वाद घातला व त्याला अर्ध्या रस्त्यात उतरवून ड्रायव्हर निघून गेला. या आलेल्या अनुभवावरून त्याला प्रवाशांचे काय हाल होत असतील याची कल्पना आली.
टॅक्सी ड्रायव्हर्सकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा अंदाज घेण्यासाठी, त्याने आपल्या संशोधक वृत्तीने अनेक शहरांमध्ये सर्व्हे केला. वेगवेगळ्या प्रवाशांच्या भेटी घेतल्या. त्यांचे अनुभव समजून घेतले. लोकांचा केलेला सर्वे, प्रवाशांशी प्रत्यक्ष भेटी आणि स्वतःचा अनुभव यातून प्रवाशांना कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि कशी गैरसोय होते, याचा त्याने पूर्ण अभ्यास केला. आणि या सर्व अडचणींवर कशी मात करता येईल, असा त्याने विचार सुरू केला. लोकांशी चर्चा करता करता त्याला व्यवसायाची संधी, सामर्थ्य व लोकांची गरज याचा पूर्ण अंदाज आला. म्हणूनच त्याला ऑनलाईन टॅक्सी बुकिंगची संकल्पना सुचली. त्याने आपला टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस आता ऑनलाइन कॅब बुकिंग सर्विसेस मध्ये परिवर्तीत केला. यातूनच उगम झाला ‘ओला कॅब्स’चा.
‘ओला’ या शब्दाचा उगम फ्रेंच भाषेतील ‘होला’ या शब्दावरून झाला. होला म्हणजे हॅलो. हे एका मैत्रीपूर्ण आणि सन्मानजनक प्रवासाचे प्रतिक असेल. म्हणजेच प्रत्येक प्रवाशाला आपला प्रवास सुखकर व आनंददायी होईल याची शाश्वती देणारे हे नाव ‘ओला कॅब’. डिसेंबर २०१० मध्ये ओला कॅब्स अधिकृतरित्या लाँच करण्यात आले. भाविष अग्रवालला अंकीत भाटी नावाचा एक मित्र सह-उद्योजक म्हणून लाभला. अंकीत भाटीने देखील आयआयटी मुंबई मधूनच बी टेक व एम टेक अशा पदवी संपादन केल्या होत्या. त्यामुळे तांत्रिक सर्व भाग अंकीतने पूर्णपणे सांभाळला.
व्यवसायाचे स्वरुप संपूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून असून इंटरनेटचा वापर करून प्रवासी व कॅबधारक यांना जोडायचे. त्यांच्यातील एक दुवा बनून दोघांचेही काम सुखकर करायचे. भाविषच्या मते उत्कृष्ट आयडीया अनेक जणांकडे असतात, पण त्या आयडियाला एका व्यवसायाचे स्वरूप देता येणे व तो व्यवसाय मोठा करणं हेच सर्वात जिकरीचे काम असते.
फार मोठं भांडवल अडकवून केलेल्या व्यवसायाला रिस्क ही तितकीच मोठी असते. त्यामुळे कमीत कमी गुंतवणूक व इन्व्हेंटरी ठेवून केलेला बिझनेस सर्वात सुरक्षित व कमी रिस्क असलेला होऊ शकतो. आज ओला कॅब्सचा व्यवसाय ह्याच तत्वावर उभा आहे.
भारतातील सर्वात मोठी टॅक्सी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी असून देखील आज ओला कॅब्सकडे स्वतःची एकही कॅब नाही. झिरो इन्व्हेंटरी या तत्वावर आज ते काम करत आहेत. टॅक्सी मालक व ड्रायव्हर यांच्यासोबत त्यांचा पार्टनरशिप प्रोग्राम आहे. म्हणजे ग्राहकाने टॅक्सी ओला कॅबच्या ॲप वरून किंवा कॉल सेंटर वरून बुक करायची आणि ती ऑर्डर स्थानिक असलेल्या टॅक्सी पार्टनरने पूर्ण करायची.
टॅक्सी मालक व ड्रायव्हर्स सुरुवातीला ओला कॅब सोबत काम करायला तयार नव्हते. आपल्याच व्यवसायात स्पर्धा वाढणार असे दिसत असल्याने कुणीही तयार होई ना. या टॅक्सी ड्रायव्हरना आणि मालकांना कसं आपल्याकडे आकर्षित करावं हा मोठा प्रश्नच होता. पण असं म्हणतात की भीती आणि लालूच ह्या दोन गोष्टी माणसाला काहीही करायला भाग पाडतात. आणि हेच सूत्र ओला कॅबनी वापरलं. स्पर्धेच्या भीतीमुळे जे टॅक्सी चालक तयार नव्हते, त्यांच्यावर आमिषाने काम केलं. त्यांनी आपल्या ड्रायव्हर पार्टनर ना दररोज ५ हजार रुपये देण्याचे कबूल केले आणि यासाठी त्यांना दिवसाला केवळ एकच राईड पूर्ण करायची होती. दिवसाला ५ हजार म्हणजे महिन्याचे तब्बल दीड लाख! इतके उत्पन्न मिळू शकतं हे कदाचितच एखाद्या ड्रायव्हरने विचार केला असावा. मग काय अगदी झपाट्याने ड्रायव्हर्स त्यांच्याशी जोडले जाऊ लागले आणि ओला कॅब जोरात धावू लागली. आता मात्र ड्रायव्हर्स स्वतःहून ओला कॅब्सशी जोडले जाण्यासाठी प्रयत्न करू लागले. भाविष आणि अंकीत यांचा उद्देश सफल झाला. आणि कालांतराने पाच हजार रुपये दिवस ऐवजी अडीच हजार रुपये देण्यात येऊ लागले. तरीही ड्रायव्हर्स वेटिंगवर होते. आणि ओला कॅब्स पूर्ण प्रस्थापित झाल्यानंतर मात्र ७५० रुपये प्रती दिवस अधिक काही मासिक पगार यावर ड्रायव्हर पार्टनर्स जोडले जात आहेत. कुठल्या परिस्थितीत कुठले निर्णय घ्यायला हवेत हे या दोघांनी चांगलंच अनुभवलं आहे.
अर्थात ओला कॅबचा प्रवास अगदी सुखकर असा कधीच नव्हता. २०१२ मध्ये एके दिवशी दोघांची रात्रीची झोप उडाली. जेव्हा ओला कॅब्सची वेबसाईट डाउन झाली होती. काही केल्या मार्ग निघत नव्हता. बंगळुरुहून अंकीत, भाविष आणि त्यांचा मुंबईतील एकमेव टेक्निकल ऑफिसर हे रात्रभर एकमेकांशी फोनवर बोलत होते. टेक्निकली मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. या प्रश्नावर मार्ग निघाला पण या प्रसंगाने त्यांना खडबडून जाग आली. नेमकं कशामुळे हा प्रसंग घडला याचा त्यांने अभ्यास केला. आपल्याकडून घडलेल्या चुका त्यांनी सुधरवण्यासाठी त्वरित पाऊल उचलले. त्यांनी लगेचच आपले मुख्यालय मुंबईहून बंगळुरुला शिफ्ट केले. त्यासोबतच केवळ वेबसाईटवर अवलंबून राहणं किती धोक्याचे आहे हे लक्षात घेऊन लगेच ओला कॅब चे ॲप्स लॉन्च केले.
ओला कॅबची प्रगती पाहता या व्यवसायात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी उडी घेतली. उबर, मेरू, फास्टट्रॅक आदींचा त्यात समावेश होता. पण ओलाच्या बिझनेसवर काही विशेष परिणाम झाला नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली दक्षता, योग्य नियोजन व दूरदृष्टी.
ओला कॅबने सुरुवातीपासूनच केवळ त्याच टॅक्सी मालकासोबत कॉन्ट्रॅक्ट केला, ज्यांच्याकडे संपूर्ण भारताचे परमिट आहे. त्यामुळे स्पर्धा वाढू लागताच त्यांनी लगेच कॅब लँडिंग म्हणजे भाडेतत्त्वावर संपूर्ण भारतात कोठेही प्रवास सेवा देण्याची सुरुवात केली. ही सेवा मात्र त्यांच्या कुठल्याही स्पर्धकाकडे नव्हती. आणि या सोबतच वेगवेगळ्या ऑफर्स आणि अगदी माफक दर यामुळे त्यांनी आपल्या ग्राहकांना धरून ठेवले. २०१२ मधील नाईलाजाने घेतलेला ॲप्स लॉन्च करण्याचा निर्णय त्यांना आता अधिक फायदेशीर ठरत होता. अंकीतने भारतात येणारी मोबाईल क्रांती आधीच ओळखली होती आणि म्हणून त्यांनी आपला विस्तार करताना मोबाईल कॉमर्स वर जास्त भर दिला. या सर्व मुद्द्यांमुळे स्पर्धेच्या जगात देखील ओला कॅबला आपले प्रथम स्थान टिकवून ठेवता आले.
२०१४-१५ पर्यंतच ओला कॅब्सकडे भारतातील १०० हून अधिक शहरांमध्ये दोन लाखाहून अधिक कॅब चालवत होते. दिवसाला दीड लाख बुकिंग म्हणजे सरासरी महिन्याला पंचेचाळीस ते पन्नास लाख ट्रिप्स ओला वरून बुक होत होत्या. आता कंपनीचे मूल्यांकन तब्बल तीन बिलियन डॉलर्स इतकं होतं. मार्च २०१५ मध्ये कंपनीचा विस्तार करण्यासाठी ओला कॅबला अधिक जास्त ड्रायव्हर्स आणि कार्सची आवश्यकता होती. अनेक ऑफर्स देऊन व अधिक पेमेंट देऊनही ड्रायव्हर्स आणि कार ची अपेक्षित संख्या जुळत नव्हती. म्हणून त्यांनी टॅक्सी व ड्रायव्हर पुरवणाऱ्या टॅक्सी फॉर शोर या कंपनीला दोनशे मिलियन डॉलर मध्ये विकत घेतलं. म्हणजे ओघानेच सर्व टॅक्सी व ड्रायव्हर्स आता ओलाचे झाले.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ओलाला विस्तार करणं महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा देण्यास सुरुवात केली. जसं कार लेंडिंग, एअरपोर्ट पिकप व ड्रॉप, रेल्वे स्टेशन पिकप व ड्रॉप इत्यादी. पण या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे ओला ऑटो रिक्षा सेवा. अतिशय माफक दरात सर्व ठिकाणी पोहोचण्यासाठी सुविधाजनक सेवा. ही खिशाला परवडणारी सेवा लोकांनाही भावली.
आजपर्यंतच्या वाटचालीत ओला कॅब्स ला सुमारे २९ हजार करोड रुपये इतकी गुंतवणूक वेगवेगळ्या ४४ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून मिळाली आहे. उद्योजक जोडीचा सर्वप्रथम हात धरला ते म्हणजे स्नॅपडील या स्टार्टअपचे उदगाते कुणाल बहेल व अनुपम मित्तल यांनी. २०११ सालच्या या अडीच कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे ओला कॅब्सने आपले पाय भक्कमपणे व्यवसायात रोवले. कंपनीची यशस्वी वाटचाल व व्यवसायाची वाढती डिमांड पाहून अनेक गुंतवणूकदार कोणी २० दशलक्ष, कोणी ४० दशलक्ष, कोणी ५० दशलक्ष रुपये अशी गुंतवणूक सतत करत होते. २०१९ अखेरीस ओला कॅब कडे ४ अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक झाली. आजचे कंपनीचे मूल्यांकन १० अब्ज डॉलर्स इतके आहे.
ओला कॅबची सुरुवात प्रथम मुंबई, त्यानंतर बेंगळुरु व दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये झाल्यानंतर भारतातील सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये आपल्या सेवा पुरविल्या आणि आता तर चक्क अटकेपार आपला झेंडा रोवला आहे. ओला कॅब्स आज ऑस्ट्रेलिया मधील सर्व प्रमुख शहरांमध्ये ४० हजार ड्रायव्हर सह फेब्रुवारी २०१८ पासून सेवा देत आहे. आणि ऑस्ट्रेलियातील सर्व ग्राहकही या सेवेपासून अतिशय संतुष्ट आहेत. फेब्रुवारी २०२० पासून ओला कॅबने लंडनमध्ये २५ हजार ड्रायव्हरसह आपली सेवा देण्यास प्रारंभ केला आहे.
ओला कॅब मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम सह सर्व प्रकारचे सुरक्षा उपकरण इन्स्टॉल केलेले असतात. पण ग्राहकांच्या सुरक्षेसोबतच आपल्या ड्रायव्हरची देखील ओला कॅबस तितक्याच आत्मियतेने काळजी घेते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच ड्रायव्हर्सच्या सुरक्षिततेसाठी ओला कॅब कडून प्रत्येक ड्रायव्हर व त्याच्या परिवारासाठी ३० हजार रुपये प्रति व्यक्ती आर्थिक सुरक्षा देण्यात आलेली आहे.
भारतात टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांपैकी ६० टक्के प्रवासी हे ओला कॅब ने प्रवास करत आहेत. ओला कॅब ने प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे आणि ह्याच जोरावर ते आपली पुढची वाटचाल करत आहेत. ओला आता लवकरच न्यूझीलँड मध्येही दाखल होत आहे. या सोबतच ओला आता उत्पादन क्षेत्रात देखील प्रवेश करत आहे. पुढील दोन वर्षात ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या उत्पादनासह जगभरातील बाजारपेठेत आपले नाव पोहोचवणार आहे. ह्या सोबतच ओला स्टोअर हे ऑनलाइन किराणा माल ऑर्डर करण्याचे अँप आता बेंगळुरु शहरात सुरू करण्यात आले आहे. १२ हजार प्रॉडक्ट्सची होम डिलिव्हरी सध्या केवळ बंगळुरु पुरती मर्यादित असली तरी लवकरच भारतभर ही सेवा पुरवण्याचा त्यांचा मानस आहे.
(लेखकाशी संपर्क मो.- 9921212643 ई मेल- prof.prasadjoshi@gmail.com)