केवळ दिवाळीत बसचं तिकीट मिळालं नाही म्हणून
केवळ दिवाळीत घरी जाण्यासाठी बसचे तिकीट भेटले नाही म्हणून अस्वस्थ झालेल्या तरुणाने अनोखे स्टार्टअप सुरू केले. आज याच स्टार्टअपचा सर्वत्र बोलबाला आहे. कोण आहे तो? कोणते आहे ते स्टार्टअप? याचा रोमांचक धांडोळा घेणारा हा लेख…
प्रा. डॉ. प्रसाद जोशी
(लेखक व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ आणि प्राध्यापक आहेत)
ही गोष्ट आहे २००५ ची. दिवाळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेली. फणिंद्रला आपल्या घरी जायची ओढ लागलेली. ऑफिसची कामं लगबगीने संपवून तो बस स्टँडवर आला, बस स्टॅन्ड बाहेरील त्याच्या नेहमीच्या ट्रॅव्हल एजंट कडे गेला आणि त्याने बेंगलोरहुन हैदराबाद साठीच्या बसची विचारणा केली. दिवाळी तोंडावर आल्यामुळे एकही सीट शिल्लक नाही असं त्याच्या एजंटने त्याला नाईलाजाने सांगितलं. त्याने लगबगीने दुसऱ्या एजंट कडे धाव घेतली पण तीन-चार एजन्ट्स कडे फिरूनही त्याला तिकीट मिळेना. त्याने बंगळुरूमध्ये दुसऱ्या बस स्टॉप्स वरही जाऊन पाहिलं, पण केवळ निराशाच त्याच्या पदरी पडली. दुप्पट किंमत द्यायला तयार असून देखील एकही तिकीट त्याला उपलब्ध झाले नाही. अतिशय खिन्न मनाने फणिंद्र माघारी फिरला आणि आपल्या कोरमंगला इथल्या फ्लॅटवर गेला. या वर्षी दिवाळी त्याला एकट्यानेच साजरा करावी लागणार होती. आणि इथेच सुरू झालं त्याचं विचारचक्र. . .
मूळचा हैदराबादचा, एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेला फणिंद्र सामा बेंगळुरू येथे टेक्सस इन्स्ट्रुमेंट्स या कंपनीत कार्यरत होता. फणींद्र आपल्या सहा मित्रांसोबत या फ्लॅटवर राहत होता. हे सर्वजण बिट्स पिलानी येथून आपलं इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण करुन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरी करत होते. पण सध्या सर्वजण दिवाळीसणा करता आपापल्या गावी गेले होते. फणींद्र मात्र एकटाच फ्लॅट वर बसला होता. दिवाळीसारखा सण त्याला एकांतात घालवावा लागणार होता. अर्थात् हे सुदैव की दुर्दैव हे काळच ठरवणार होता.
ही घटना त्याला फार जिव्हारी लागली होती. व अशा परिस्थितीवर कशी मात करता येईल हा एकच विचार त्याने पूर्ण दिवाळीत केला. ह्या प्रश्नावर योग्य ते उत्तर शोधायला हवं असा ध्यास त्याला लागला होता. कधी नशिबाला कधी स्वतःला तर कधी त्या गर्दीला आणि तिकीट एजंटला दोष देत विचार करत फणींद्र बसला होता. ह्याच विचारात असतांना तो अनेक शक्यतांबद्दल स्वतःशीच चर्चा करत होता.
कदाचित अशी कुठली एक बस असेल की ज्यात सीट रिकामं गेलं असेल. कदाचित असा एखादा ट्रॅव्हल एजंट असेल ज्याच्याकडे एक तिकीट होतं पण त्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही. म्हणजे कदाचित एक तिकीट असूनही एका ग्राहकाला ते तिकीट मिळू शकलं नाही आणि ट्रॅव्हल एजंटचं, बस ऑपरेटरचं आणि पर्यायाने सर्वांचंच एका तिकीटाचं नुकसान झालं असावं.
जर हे सर्वजण एका वेब बेस्ड प्लॅटफॉर्मवर जोडलेले असते, जर प्रत्येकाला प्रत्येकाकडील स्थिती माहित असती, आकडे माहित असते तर कदाचित माझ्यासारख्या प्रवाशांचं नुकसान झालं नसतं, कदाचित प्रवाश्यांने तिकीट ऑनलाइन बुक केलं असतं आणि पर्यायाने सर्व व्यवसायिकांना त्यांचा व्यवसाय करणं सोपं झालं असतं. अशा विचारातच त्याने आपली दिवाळी घालवली. त्याचे रूम-मेट्स परत येताच त्याने ही संकल्पना आपल्या मित्रांकडे मांडली आणि त्याच्या मित्रांनी देखील ही संकल्पना उचलून धरली. अर्थात ह्या सात जणांच्या टीम पैकी चार जणांनी काही महिन्यातच आपल्या वाटा बदलल्या. पण फणिंद्र , चरण आणि पद्मराजू ह्यांनी ह्या नवीन प्रोजेक्टवर काम जोमाने सुरु केले. उद्देश केवळ प्रवाशाचा प्रश्न सोडवता यायला हवा इतकाच होता, त्याला स्टार्टअपचे स्वरूप नकळत आले.
फणिंद्र सामा, चरण पद्मराजु आणि सुधाकर पसूपूनुरी ह्या तिघांपैकी कोणालाही बसेस बुकिंग व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातलं काहीही ज्ञान नव्हतं. . . इतकंच काय पण तिघांनाही वेबसाइट डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर बद्दलची काहीही माहिती नव्हती. त्यामुळे अगदी सॉफ्टवेअर कसं बनवायचं याच्या पुस्तकांच्या खरेदीपासून त्यांना तयारी करावी लागली. पण तरीही प्रचंड मेहनतीने आणि अभ्यासाने त्यांनी आपली स्वतःची तिकीट बुकिंग साठी ची वेबसाईट स्वतः तयार केली.
वेबसाईटचे नाव चटकन लक्षात राहील असं काहीतरी असावं म्हणून त्यांनी रेडबस डॉट इन (redbus.in) असं डोमेन रजिस्टर केलं. तिघेही जण नोकरीत असल्यामुळे आपल्या ऑफिसचे काम सांभाळून हे सर्व काम केवळ वीकेंडला करत असत. वेळ कमी पडतोय असं लक्षात येताच चरण याने तीन महिन्यांची विशेष सुट्टी मंजूर करून घेतली.
आपली तयार वेबसाईट घेऊन त्यांनी अनेक बस ऑपरेटर्सना भेटी दिल्या. आपली कन्सेप्ट समजावून सांगितली आणि याचे ऑपरेटर्सना व एजंटला काय फायदे होऊ शकतात हेही समजावले. पण ऑपरेटर्स कडून येणाऱ्या प्रश्नांनी व कारणांनी त्यांच्या उत्साहावर काही अंशी विरजण घातले.
“एवढी इंटरनेट सेवा कोणाकडे असते? आणि कोण जाऊन ऑनलाईन बुकिंग करणार आहेत? किंवा मध्येच जर लाईट गेली तर आम्ही आमच्या ट्रिप लिस्ट ची प्रिंट कशी घ्यायची? आमच्या कुठल्याही एम्पलोयीला कम्प्युटर किंवा तुमचे सॉफ्टवेअर चालवता येतच नाही तर मग आम्ही हे कसं करायचं?”ही जरी सांगायची कारणे असलीत तरी सर्वात मोठा चिंतेचा विषय त्यांच्यासाठी हा होता की सर्व डेटा ऑनलाइन असणार् व त्यामुळे किती ब्लॅक किती व्हाईट, हा सगळा हिशोब सहज पकडला जाऊ शकतो. म्हणून बरेच ट्रॅव्हल एजन्ट्स दूर पळत होते.
अखेरीस, राजेश ट्रॅव्हल्स आणि जब्बार ट्रॅव्हल्स या दोन ऑपरेटरनी काही मागच्या सीट्स देऊ केल्या. बस मधील सर्वात शेवटच्या रांगेतली ५ सीट (जे कुठलाही ग्राहकाची कधीच पसंती नसते) यांना विकण्यासाठी मिळाल्या.
” जर तुम्ही या पाच सीट्स विकू शकलात तर ठीक आहे नाहीतर पुन्हा फिरून इथे येऊ नका” अशाच शब्दात त्यांना आपली पहिली ऑर्डर मिळाली होती. फार मेहनतीने प्राप्त झालेली संधी त्यांना सोडायची नव्हती आणि म्हणूनच आपल्या वेबसाइटच्या मार्केटिंग करता ते स्वतः रस्त्यावर उतरले. बेंगलोर मधील अनेक आयटी कंपन्यांसमोर लंच टाइम मध्ये तिथल्या एम्प्लॉईज सोबत चर्चा करू लागले. रेडबसची माहिती देऊ लागले. २२ ऑगस्ट २००६ रोजी त्यांच्या वेबसाईटवरून पहिलेवहिले तिकीट विकले गेले. एका महिलेने तिरुपती पर्यंत हे तिकीट बुक केले होते. आणि पुढील पाच दिवसात उर्वरित
चारही तिकिटं विकले गेले त्यामुळे आमच्या व्यवसायाला श्री तिरुपती बालाजी यांचा आशीर्वादच लाभला असे ते आवर्जून सांगतात.
आणि अशा पद्धतीने रेडबस ची गाडी सुरू झाली. पहिले ऑनलाईन तिकीट बुक केलेले असताना त्या बसच्या निघण्याच्या वेळी हे तिघेही त्या बस स्टॉप वर जाऊन उभे राहिले कारण त्यांना शाश्वती नव्हती की हे तिकीट कंडक्टर नक्की स्वीकारेल का? तिकिटासाठी तो व्हेरिफिकेशन कसं करणार? ऍलोट झालेला सीट नंबर खरंच त्या प्रवासी महिलेला मिळेल का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी त्यांनी स्वतः या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे ठरवले. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर उत्साहापेक्षाही भीती जास्त वाटत होती.
सुरुवातीच्या काळात बस ऑपरेटर्स आणि ट्रॅव्हल एजंट त्यांच्या मनातील भीती काढण्यातच फार वेळ गेला. कम्प्युटर ऑपरेशन्स आणि सॉफ्टवेअर याबद्दलच्या असलेल्या समज गैरसमजांमुळे सुरवातीच्या काळात त्यांना कोटा सिस्टम वरच काम करावे लागले. म्हणजे ऑपरेटर कडून काही ठराविक सीट्स घ्यायच्या, त्यातल्या शक्य होतील तितक्या सीट ऑनलाइन विकायच्या आणि उर्वरित सीट्स वेळेच्या मर्यादेत परत करायच्या. हे चक्र साधारण साडे तीन वर्ष चाललं.
ऑपरेटर्सचा विश्वास संपादन झाल्यावर त्यांनी आपलं तिकीट बुकिंगचं सॉफ्टवेअर एजंट्सला देऊ केलं. हे सॉफ्टवेअर थेट रेडबसच्या वेब पोर्टल लिंक होतं. त्यामुळे ऑनलाईन किंवा ऑफलाईन केलेल्या सर्व तिकिट्सचे बुकिंग स्टेटस या सॉफ्टवेअर मध्ये दिसत. साडेतीन वर्ष कमावलेली विश्वासार्हता आणि दर्जेदार सेवा, यामुळे या सॉफ्टवेअरची चर्चा सर्वत्र होऊ लागली व लवकरच अनेक ऑपरेटरने स्वतःहून या सॉफ्टवेअरची मागणी सुरू केली. एका वर्षाच्या आतच त्यांनी ३५० हून अधिक बस ऑपरेटर्सच्या नोंदणी या सॉफ्टवेअर वर केल्या म्हणजे सरासरी प्रति दिवशी एक या गतीने बस ऑपरेटर्स जोडले जाऊ लागले. कारण आता बस ऑपरेटर्सच्या ही लक्षात आले होते की आपले जितके सीट्स ऑनलाइन दिसतील तितकीच आपली विक्री जास्त प्रमाणात होईल.
एक मोठा उद्योग नावारूपाला येत होता. राहत्या फ्लॅटच्या एका खोलीमध्ये त्यांनी आपलं ऑफिस थाटलं होतं. व्यवसायासाठी भांडवल म्हणून तिघांनी आपापल्या सेविंग मधून ५ लाख रुपये जमवले होते. तुमच्या प्रयत्नांमध्ये जर प्रामाणिकपणा असेल तर परमेश्वर देखील योग्य मार्ग दाखवतो आणि तसेच काहीसे घडले. २००६ मध्ये त्यांची निवड टी आय ई इन्ट्रप्रेनारशीप ऍक्सेलरेशन प्रोग्राम (हा प्रोग्रॅम उद्योजकता विकासासाठी अतिशय नावाजलेला आणि अनेक मोठे यशस्वी उद्योजक देणारा म्हणून प्रसिद्ध आहे.) साठी झाली. या प्रोग्राम मध्ये त्यांना तीन मेंटर देण्यात आले. आणि या मेंटरसनी त्यांना गाईड केले आजच्या स्थिती पर्यंत पोहोचण्यासाठी. दर आठवड्याला या मेंटर नी त्यांना काही ना काही असाइनमेंट द्याव्या.
जसे मार्केट सर्वे करून या, शहरात किती बस आहेत? कुठल्या रूटवर किती बसेस धावतात? साधारण एजंट्स कमिशन किती असतं? प्रत्येक बसमध्ये किती सीट्स रिकामी जातात? प्रवासी आपले तिकीट कसे बुक करतात? प्रवाशांच्या साधारण अपेक्षा काय असतात? अशा अनेक प्रश्नांची सखोल माहिती त्यांना जमा करण्यास सांगितलं. आणि जसं सांगण्यात आलं तशीच मेहनत या तिघांनी घेतली. आणि ही मेहनत लवकरच फळास ही आली.
फेब्रुवारी २००७ मध्ये त्यांना आपली पहिली फंडिंग म्हणजेच गुंतवणूक सीडफंड कडून मिळाली. या फंडिंगच्या मीटिंगमध्ये त्यांनी तीस लाख रुपयांची मागणी केली होती आणि जसं व्हेंचर कॅपिटलिस्ट (व्हेंचर कॅपिटलिस्ट हे नवीन कंपन्यांना आर्थिक सहकार्य करून त्यांच्या नफ्यातील भागीदार होतात.) चर्चा करत होते, बिजनेस समजून घेत होते, त्यांनी या कंपनी करता चक्क तीन करोड रुपयांची फंडिंग मंजूर केली. या पैशाचा विनिमय त्यांनी योग्य ते स्टाफ निवडणे, सॉफ्टवेअर अपडेट करणे, आणि आपले स्वतःचे ऑफिस स्थापन करणे याकरता केला. आता रेड बस कडे पंधरा राज्यातील ५ हजार रूटवर धावणाऱ्या बसेसच्या पाचशे ऑपरेटर्सची पार्टनरशिप होती. इतकच नव्हे तर देशभरात ७५ हजाराहून हून अधिक तिकीट बुकिंग पार्टनर्स त्यांनी स्थापन केले. संपूर्ण भारतात त्यांना आता नजिकचा स्पर्धक राहिला नव्हता.
पण हे सर्व करत असताना त्यांनी उभे केलेले तीन करोड रुपये, दीड वर्षातच संपुष्टात आले आणि आता पुन्हा त्यांना फंडिंग ची जरूर भासू लागली. पण आता काळ वेगळा होता. २००८ मध्ये संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली वावरत होतं आणि अशात फंडिंग मिळवणे अत्यंत अवघड झालं होतं. जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आधी फंडिंगला उत्सुक होते, आता त्यांनीही पाठ फिरवली होती. हे एक-दीड वर्ष अतिशय कठीण आणि परीक्षेच ठरत होतं. अखेर ‘सीडफंड’, ‘इन्व्हेन्टस कॅपिटल’ ह्या व इतर काही गुंतवणूकदारांकडून रेडबसला २.५ मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण १७ करोड रुपये इतकी फंडिंग जुलै २००९ मध्ये मिळाली. ह्या फंडिंगचा उपयोग रेडबसच्या विस्ताराकरता केला. केवळ ट्रॅव्हल कम्पनी न रहाता त्यांनी आता ट्रॅव्हल्स क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स देखील पुरवायला सुरुवात केली. भारतातील प्रमुख १० महानगरांमध्ये त्यांनी आपली ऑफिसेस स्थापन केली. २५० हुन अधिक लोकांना नोकरीवर ठेवले.
रेडबसच्या उत्पन्नातही वर्षागणिक अनेक पटीत वाढ होत होती. २००७ मधील त्यांना ५० लाखांचे उत्पन्न मिळाले होते. व ते एकाच वर्षात १० पट म्हणजेच २००८ मध्ये ५ करोडांवर गेले. ही झेपच जेव्हा स्वप्नवत वाटावी तोच त्यांच्या २००९ मधील उत्पन्नानी तर थेट ३० करोड गाठले. आणि तोच आकडा २०१० साठी थेट दुप्पट म्हणजे ६० करोडला भिडला. ह्या गरुड झेप घेत असलेल्या स्टार्टअपला आणखी बळ मिळाले ते मे २०११ मध्ये मिळालेल्या अतिरिक्त ४५ करोड रुपयांच्या फंडिंगचं.
ह्याच वर्षी रेडबस ने तब्बल ३५ लाख तिकीट बुकिंगचा विक्रमी पल्ला गाठला होता, आता त्यांनी आपले पाय खंबीरपणे रोवले होते. खासगी बसेस सोबतच त्यांनी आता गोवा आणि राजस्थान यांच्या परिवहन महामंडळांसोबत करार करून त्यांच्याही बसेसचे बुकिंग सुरु केले होते. ह्या जोरावर त्यांनी एकाच वर्षात १ करोड तिकिट बुकिंगचा टप्पाही सहज सर केला. २०१३ मध्ये रेडबसचे मूल्यांकन ७०० करोड रुपयांवर होऊ लागलं. कर्नाटक राज्य परिवहन महामंडळासोबत त्यांचा झालेला करार त्यांना केवळ महामंडळाच्याच नव्हे तर खासगी देखील सर्व बसेसच्या बुकिंगचे अधिकार देऊन गेला.
प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी, सातत्य आणि अथक प्रयत्नांच्या जोरावर आज रेडबस यशाच्या ऊंच शिखरावर बसून विजयश्रीचा प्रसाद चाखत होते. जगातील ५० सर्वोत्कृष्ठ, सृजनशील उद्योगांसोबत रेडबसचे नाव घेऊ लागले. गूगल, फेसबुक, ऍपल अशा कंपन्यांच्या रांगेत रेडबसला बसवले जाऊ लागले. आकाशही जणू रेडबस पुढे ठेंगणं वाटावं अशी स्थिती असतांना अचानक जून २०१३ मध्ये एक बातमी येते आणि सर्वांनाच भयंकर धक्का देऊन जाते. रेडबसने आपली कंपनी दक्षिण आफ्रिकेतील नॅसपर्स ह्या समूहाच्या आयबिबो ग्रुपला १२० मिलियन डॉलर्स म्हणजे साधारण ७९० करोड रुपयाला विकली आहे. भारतीय आय टी कंपनीसाठी मिळालेली ही सर्वात मोठी किंमत होती.
रेडबस का विकली? असा प्रश्न विचारता फणींद्र म्हणतो “आयबिबो हा फार मोठा ग्रुप आहे आणि त्यांच्याकडच्या प्रगत तंत्रज्ञानाने तो रेडबसला आणखी मोठं करू शकेल व त्यात असलेल्या पोटेन्शिनला वाव मिळू शकेल. “आज रेडबस वरून बसेस बुकिंग सोबत, हॉटेल्स, कॅब्स आणि इतरहि हॉस्पिटॅलिटीज् बुकिंगची कामं होताहेत.
फणींद्रने व्यवसायापासून दूर राहण्याचा काही वर्षांसाठी निर्णय घेतलाय. त्याने स्वीडन येथून लीडरशिप, आणि नंतर स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी मधून अर्थशास्त्र व मानसशास्त्राचे शिक्षण घेतले. सध्या तो तेलंगणाच्या राज्यसरकार साठी चीफ इनोव्हेशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे व आज तो तरुणांना स्टार्टअप्स बद्दल प्रोत्साहित करत आहे. तसेच स्वतः एंजल इव्हेस्टर बनून निवडक स्टार्टअप्स मध्ये स्वतः गुंतवणूक देखील करतो आहे.
रेडबसचा जन्म हा लेख खूपच प्रेरणादायी वाटला. इतके दिवस रेडबस ही परदेशी कंपनी समजत होतो कारण सिक्स सिग्मा सारख्या काही संकल्पना त्यात वापरल्या जातात असा अनुभवाने आलेला अंदाज होता. छान वाटलं वाचून
रेडबसची टीव्ही वर आता पर्यंत फक्त जाहिरात पाहीली होती,पण तिच्या जन्मापासून आणि जन्मदात्यापासूनची उत्तम माहिती व उद्योग क्षेत्रातील झेप ,याबाबतची कहाणी अत्यंत प्रभावी पणे मांडली आहे. अनेक युवकांना यातून प्रेरणा मिळेल.
अभिनंदन डॉ प्रसाद व.जोशी
Interesting n informative write up
डॉ.प्रसाद आपण लिहिलेले “स्टार्टअप ची दुनिया” या कॉलम मधील हे दूसरे पुष्प..
सध्याच्या या परिस्थितीत तरुणांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी सदर लेख अत्यंत उपयुक्त. मनात ठरविले तर काहीही करू शकतो हां महत्वपूर्ण सन्देश. तसेच निराशेतुन आशेकडे मार्गक्रमण करण्यासाठी गरज असते ती सकारात्मक दृष्टीची… रेडबसच्या जन्मामागचा हा कर्तृत्ववान उद्योजक आपण खूप छान शब्दबद्ध केलात यातून नक्कीच उद्योग करू ईच्छीणाऱ्याना प्रेरणा मिळेल.
प्रा.डॉ.प्रसाद जोशी आपले मन:पूर्वक अभिनंदन…
वा,वा खुपच सुंदर लेख आहे.
अप्रतिम विस्लेशन, खूप सुंदर लेखणी