नवी दिल्ली – पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या काँग्रेसच्या बैठकीत अनेक वादाच्या मुद्द्यांवर खूप चर्चा झाली तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पक्षातील नेतृत्त्वाच्या प्रश्नावरील अंतर्गत कलह थांबला दिसत नाही. परिणामी सोनियांसोबतची ही चर्चा निष्फळ ठरल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
काँग्रेस संघटनेच्या नेतृत्त्वाच्या प्रश्नावरील अंतर्गत कलह थांबवण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलविली होती. वरिष्ठ नेत्यांच्या पत्रासंबंधी वादाच्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. परंतु कॉंग्रेसची पुढील दिशा ठरण्यासाठी विचार शिबिर घेण्यात यावे यासारख्या अन्य काही सूचना पक्ष हाय कमांडने त्वरित स्वीकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु नाराज गटातील नेते अजूनही कॉंग्रेसचे संसदीय मंडळ आणि पक्षात सामूहिक नेतृत्व स्थापनेविषयी बोलण्यावर ठाम आहेत.
काय घडले नेमके या बैठकी दरम्यान…
राहुलच्या नावाने टाळ्यांचा कडकडाट मात्र असंतुष्ट नेते गप्पच
या बैठकीत जेव्हा नेतृत्त्वाच्या मुद्यावर काही नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला, तेव्हा असंतुष्ट नेते गप्प राहिले, परंतु त्यावर आक्षेप देखील घेतला नाही. कॉंग्रेसचे सध्याचे संकट सोडविण्यासाठी यापुढे चर्चेची फेरी सुरूच राहील, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
समस्यांचे निराकरण नाही :
कॉंग्रेसच्या नेतृत्वाबाबत दीर्घकाळ गोंधळ उडालेला असताना पक्षातील काही नेत्यांशी झालेल्या वादानंतर सोनिया गांधींनी पहिल्यांदाच 10 जनपथ येथे या नेत्यांसमवेत पाच तासांची बैठक घेतली. यात हाय-कमांडचे काही जवळचे नेते, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह जी -23 नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीत असंतुष्ट गटाचे नेतृत्व करणारे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, पत्रामध्ये उपस्थित झालेल्या मुद्द्यांवरील चर्चा सुरू झाली असतानाही त्यांचे निराकरण झाले नाही.
संसदीय मंडळ स्थापन करण्याची गरज:
सद्यस्थितीत कॉंग्रेसच्या सध्याच्या संकटात तटस्थ भूमिका निभावणारे पी. चिदंबरम यांनी बैठकीत सांगितले की, पक्षाच्या संसदीय मंडळाची स्थापना करणे ही अटळ गरज आहे. देशातील एकतर्फी राजकीय संवाद रोखण्यात कॉंग्रेस अक्षम असल्याचे सिद्ध करीत आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय, आर्थिक आणि राजकीय विषयांवर पक्षाचा दृष्टीकोन ताबडतोब ठरवून भाजपच्या आव्हानाला उत्तर देण्याची संसदीय मंडळाला आवश्यकता आहे.
सलोखा करण्याची तयारी :
सोनिया आणि प्रियांका गांधी यांनी असंतुष्ट नेत्यांशी सलोखा करण्याबाबत या बैठकीत अधिक उत्साह आणि तयारी दर्शविली. सोनिया म्हणाल्या की, कॉंग्रेस एक मोठे कुटुंब आहे आणि पक्षाची आव्हाने सोडविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित काम केले पाहिजे.
ज्येष्ठ नेते महत्वाचे :
वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधांबद्दल राहुल गांधी म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे आणि मला त्यांचा पूर्ण आदर आहे. विशेषत: यातील बरेच वरिष्ठ नेते हे त्यांचे वडील स्व. राजीव गांधी यांचे मित्र होते. त्याचवेळी, अंबिका सोनी म्हणाल्या की, राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपद सोपवावे. काही निकट नेत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला, तर असंतुष्ट शिबिराच्या नेत्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.