मुंबई – बर्फाच्छादित लडाख सीमेवर तैनात जवानांसाठी थंडीपासून बचाव करणाऱ्या पर्यावरणपूरक तंबूचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संशोधक-तंत्रज्ञ सोनम वाँगचूक यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. वाँगचूक यांच्या प्रयोगाचे ,’ही आहे देशभक्ती, हे आहे देशप्रेम. तुमच्या जिद्द आणि समर्पणाला सोनम जी सलाम!’ अशा शब्दांत कौतुकदेखील केले आहे.
मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, “देशाच्या रक्षणासाठी अविचल, निष्ठेने सज्ज जवानांसाठी आपल्या ज्ञानाचा आणि प्रतिभेचा उपयोग व्हावा यासाठी धडपडणे यालाच देशभक्ती, देशप्रेम म्हणतात. बर्फाच्छादित प्रदेश, कडाक्याची थंडी या निसर्गाच्या प्रकोपाला तोंड देतानाच, देशाच्या सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या शत्रूलाही जरब बसवण्यासाठी आपले जिगरबाज जवान डोळ्यात तेल घालून सतर्क असतात. या जवानांचा आणि पर्यावरणीय समतोल यांचा विचार करून तुम्ही संशोधित केलेल्या सुविधा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील. देशाप्रती तुमची ही बांधिलकी तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आणि देशाभिमान जागृत करणारी ठरेल असा विश्वास आहे. तुमच्या अशा सर्व प्रयत्न, प्रकल्पांना जरूर पाठबळ देऊ. या शब्दांसह, सोनम जी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा…जय हिंद!!”