सैनिकहो तुमच्यासाठी
देशाच्या सीमांचे शूर जवान सतत रक्षण करीत असतात म्हणून आपण सुखाने झोपू शकतो. दिवाळी सारखे अनेक सण आनंदाने साजरे करून खमंग फराळावर ताव मारतो.अखंड देशसेवेचे व्रत घेतलेल्या शूरवीर जवानांना कुटुंबियांसमवेत सण साजरे करता येत नाहीत. अशा लष्करी बांधवांकरीता आदिवासी महिला दिवाळी फराळ तयार करण्यासाठी सरसावल्या आहेत. जव्हारच्या दिव्य विद्यालयाला ही संधी मिळाली आहे. येथील कर्मचाऱ्यांसमवेत १० आदिवासी महिला तब्बल एक हजार किलोंचा फराळ बनविण्यात मग्न आहेत.१६ जणांचा चमू या उपक्रमात सहभागी आहे.
दिवाळी हा सण आनंदाचा, दिव्यांचा, प्रकाशाचा उत्सव आहे. खाद्यपदार्थांची यावेळी चंगळ असते. शेव, चकली, लाडू यांचे नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. घरोघरी असे गोड – तिखटमीठाचे पदार्थ तयार केले जातात. हल्ली तर बाजारपेठेतही रेडिमेड फराळाची रेलचेल असते. पण दुर्गम भागात खडतर वातावरणात जवानांना असा फराळ कसा मिळणार ? त्यासाठी काही सामाजिक संस्था, कार्यकर्ते पुढे आले आहेत. पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे आदिवासी समाजातील अंध, गतिमंद मुलांसाठी दिव्य विद्यालय चालविण्यात येते. या विद्यालयाकडे फराळाचे पदार्थ तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रमिला कोकड या अविवाहित राहून अनेक वर्षांपासून दिव्य विद्यालयाची धुरा सांभाळत आहेत. येथे सुमारे १३५ विद्यार्थी राहून शिक्षण घेतात.विद्यार्थ्यांना समाजात ताठ मानेने जगता यावे यासाठी त्यांना स्वावलंबी करण्यावर भर दिला जातो. शिक्षणाबरोबरच रोजगार व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. स्वावलंबनाचे धडे येथील विद्यार्थी गिरवतात. त्यासाठी विद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक सदैव प्रयत्नशील असतात. कोविडमुळे शासनाच्या सूचनेनुसार मार्च महिन्यात विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पालकांसमवेत पाठविण्यात आले. मात्र कर्मचारी, शिक्षक तेथेच रहात आहेत. शाळा बंद असली तरी खर्च सुरुच आहेत. सध्याच्या परिस्थितीत देणगीदारांचा ओघही कमी झाला आहे. खर्च भागविण्याच्या विवंचनेतून दिवाळी फराळाची कल्पना समोर आली. त्याला मूर्त स्वरूप इतरांच्या पाठिंब्याने आले.
दहिसरची हिंदू नववर्ष स्वागत समिती, भारत विकास परिषद, सदगुरु एज्युकेशन ट्रस्ट या सामाजिक संघटनांंनी हे फराळ निर्मितीचे काम दिले आहे. दिव्य विद्यालयाच्या संस्थापिका प्रमिलाताई कोकड व व्यवस्थापिका प्रियंका धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस दिवाळी फराळ निर्मितीचे कार्य सुरु आहे. या संदर्भात प्रमिलाताईंशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, नीट बघितले तर कोणत्याही संकटाच्या काळोखात आशेचा किरण दिसतोच. आमच्यावर हा संधीचा प्रकाशझोत पडला. कर्मचारी, शिक्षकांना दिवाळी फराळाची कल्पना सांगितली. ते उत्स्फूर्तपणे पुढे आले. लगेचच कामाला सुरुवात झाली.परिसरातील गरजू आदिवासी महिलांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. हा फराळ तयार करताना कोविड संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. स्वच्छता, शुद्धता व सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेण्यात आली आहे. फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी उच्च दर्जाचे वाणसामान वापरत आहोत. सर्वांना आवडणारे शेव, चकली, पातळ पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी व रव्याचे लाडू असे पाच पदार्थ करण्यात येत आहेत असे त्यांनी सांगितले. येत्या आठवड्यात हा सर्व दिवाळी फराळ रवाना करण्यात येईल. थेट लडाख, अरूणाचल प्रदेश येथे पोहोचेल. तेथे आपल्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या जवानांना ऐन दिवाळीत फराळाचा आस्वाद घेता येईल असे नियोजन करण्यात आले आहे.
फराळ जास्तीतजास्त दिवस चांगला टिकावा यासाठी उत्तम बॉक्स पॅकिंग करण्यात येत आहे असे सांगून प्रमिलाताई पुढे म्हणाल्या, या निमित्ताने आम्हालाही देशसेवेची, आपल्या शूर जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. रक्त गोठवणाऱ्या थंडीत काम करणाऱ्या सैनिकांना दिवाळी फराळामुळे मायेची ऊब देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. उपक्रमामुळे आदिवासी महिला व दिव्यांगांसाठी रोजगाराचे एक नवे दालन उघडले गेले. महिला सक्षमीकरण करण्याचा नवा मार्ग गवसला आहे.या पुढील काळात मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमात सामावून घेतले जाईल.मोठ्या प्रमाणावर फराळ बनवत असल्याने आता आत्मविश्वास वाढला आहे. पुढच्या टप्प्यात शाळा सुरु झाल्यावर देखिल असेच छान पदार्थ बनविण्यात दिव्य विद्यालय प्रयत्नशील राहील. वर्षभर सातत्याने लागणारे पदार्थ तयार करून त्यांचे योग्य पध्दतीने वितरण करण्याची योजना आखली जाईल. विशेष म्हणजे हे दिवाळीच्या फराळाचे पदार्थ आमच्या विद्यार्थ्यांच्या झोपडीपर्यंत देखिल आम्ही पोहोचवणार आहोत. पाच पदार्थांंच्या प्रत्येकी २०० ग्रॅमचा एकत्रित १ किलो फराळाचा बॉक्स घरपोच देण्यात येईल. ठाणे शहरातूनही आम्हाला दिवाळी फराळाची स्वतंत्र ऑर्डर मिळाली आहे. इतर संस्था, संघटनांनी किमान १० किलो किंवा जास्त प्रमाणात फराळाची ऑर्डर दिली तर वेळेवर डिलिव्हरी करण्यात येईल.त्यासाठी ९४२३३६९२७१ आणि ७८८७६४७६७२ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी सांगितले.
आदिवासींची दिवाळी
आदिवासी वारली जमातीत होळी हा सण दिवाळीपेक्षा मोठा असतो. अलीकडे जव्हार तलासरी, पालघर अशा गावांमध्ये शहरांप्रमाणे दिवाळी साजरी केली जाते. मात्र दुर्गम पाड्यांवर अजूनही परंपरागत साध्या पध्दतीने दिवाळीचा सण साजरा होतो.लाडू, चकली, करंजी, चिवडा असे पदार्थ न करता खास त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ करतात.यावेळी सावेलीच्या पानात तांदळाच्या कण्या व काकडी उकडून
सावेला हे पक्वान्न करण्यात येते. तांदळाच्या पिठाचे उकडून लाडू तयार केले जातात. रताळ्यांंप्रमाणे असणारे कडू कंद उकडून खातात. वाघबारसच्या दिवशी वाघदेवतेच्या पूजनाने दिवाळीचा प्रारंभ होतो. नव्या धान्याची पूजा केली जाते.होळीचा सण मात्र महिनाभर उत्साहात साजरा केला जातो. तेंव्हा आदिवासींचा उत्साह ओसंडून वाहत असतो. रात्ररात्र तारपा नृत्यात वारली स्त्री पुरुष रंगून जातात.
दिव्य विद्यालयाची अनोखी वाटचाल.
श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे जव्हार येथे दिव्य विद्यालय उपक्रम राबविण्यात येतो. सध्या येथे १३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ४५ दृष्टीहीन असून ९० विद्यार्थी गतीमंद आहेत. विद्यार्थ्यांकडून कोणतीही फी घेतली जात नाही. निवास व भोजनासह विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीद्वारे शिकविण्यात येते. योगावर्ग, संगीतवर्ग तसेच अगदी अंध विद्यार्थ्यांना देखील संगणक प्रशिक्षण दिले जाते. २० शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. दरमहा सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. आजारी विद्यार्थ्यांवर गरजेनुसार ठाणे, नाशिक येथील रुग्णालयात उपचार केले जातात. युके सेवा इंटरनॅशनल या संस्थेने दिव्य विद्यालयाची इमारत व वसतीगृह बांधून दिले आहे. शाळेला कोणतेही शासकीय अनुदान मिळत नाही. विविध ट्रस्ट, कॉर्पोरेट सीएसआर फंड व देणगीदारांच्या उदार आश्रयातून सगळे खर्च भागवले जातात. विद्यार्थ्यांकडून तसेच संस्थेच्या वर्कशॉपमध्ये कलात्मक लाकडी वस्तू, वारली चित्रे, कापडी पिशव्या, पर्सेस तयार करून त्यांची विक्री करण्यात येते. विमल केडीया हे संस्थाप्रमुख असून मनोहरलाल सिंघानिया अध्यक्ष आहेत. प्रमिलाताई कोकड सचिव व सुधीर शर्मा खजिनदार आहेत. सदस्यपदी संजय खन्ना,रविकांत राठी,शशीधर जोशी, विजय मिरीयाल व शंतनू देसाई आहेत. प्रमिलाताईंना आतापर्यंत राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. दिव्य विद्यालयाची ही अनोखी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे.