मालेगाव- येथील कवी प्रा. व्ही. सी. सोनार पुरस्कृत व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने दिला जाणारा ‘क्षितिज सन्मान’ दिवंगत साथी सेवाव्रती विकास मंडळ यांचे कुटुंबीयांना भावपूर्ण वातावरणात देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रा. सोनार यांनी बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवीच्या व्याजाच्या रकमेतून सेवा दल सैनिकांना ‘क्षितिज सन्मान’ देऊन गौरविण्यात येते. यावर्षी मंडळ परिवाराचा महापौर ताहेरा शेख यांच्या हस्ते मानपत्र, मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. मंडळ परिवाराचे वतीने कविता मंडळ, चिन्मय मंडळ, एच. एस. मंडळ यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी माजी उपमहापौर तथा नगरसेवक ॲड ज्योती भोसले, शिक्षिका वैशाली भामरे, सेवा दलाचे राज्य सचिव नचिकेत कोळपकर, जिल्हाध्यक्ष विलास वडगे, तालुकाध्यक्ष सुधीर साळुंके विचारमंचावर उपस्थित होते.
विकास मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सेवा दलाने अहिराणी भाषा गौरव दिन, सावित्री वदते, दिवाळी मीलन असे अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केले होते. साथी मंडळ यांनी कोरोना काळात झोपडपट्टीत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तसेच पोलीसांची जेवणाची व्यवस्था केली होती. याच काळात त्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या कार्याला सेवा दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
क्षितिज सन्मानाची भूमिका तसेच मानपत्राचे वाचन निवड समिती अध्यक्ष तसेच सेवा दलाचे जिल्हा संघटक रविराज सोनार यांनी केले. नचिकेत कोळपकर यांनी सुत्रसंचलन केले. राजीव वडगे यांनी आभार मानले.
मामको बॅंकेचे संचालक राजेंद्र भोसले, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, सौ. मंगला देवरे, श्रीमती ए. टी. महाजन, सेवानिवृत्त उपायुक्त अशोक कापडे, सुरेंद्र टिपरे, जावीद अहमद, अॅड मनोज चव्हाण, स्वाती वाणी, डॉ संदीप खैरनार, प्रा. अनील महाजन आदींसह सेवा दल सैनिक उपस्थित होते.