दिंडोरी – तालुक्यातील जानोरी येथील रितेश समाधान पाटील (१७) या शिवप्रेमी युवकाचा रामशेज किल्ल्यावर पाय घसरुन मृत्यू झाला आहे. हा शिवप्रेमी युवक आपल्या मित्रांबरोबर आशेवाडी येथील रामशेज किल्ल्यावर फिरायला गेला होता. किल्ल्यावरील पाण्याच्या कुंडीत पाय घसरून पडल्याने डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीत मृत्यू झाला. घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील पत्रकार समाधान छबू पाटील यांचा मुलगा रितेश समाधान पाटील हा आपल्या मित्रांबरोबर रामशेज किल्ल्यावर फिरायला गेला होता. यावेळी रामशेज किल्ल्यावर पोहोचल्यानंतर तो तेथील पाण्याच्या कुंडी जवळ गेला. तेथे त्याचा पाय घसरून तो पाण्याच्या कुंडीत पडला. त्यावेळी त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूस गंभीर दुखापत झाली. युवकांच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या कुंडीतून बाहेर काढण्यात आले. सोबत असलेल्या मित्रांनी रितेशला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत उचलून आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे रितेशला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रितेश हा एकुलता एक मुलगा असल्याने झालेल्या या प्रकारामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रितेशच्या पश्चात आई, वडील,आजी, आजोबा, बहिण असा परिवार आहे. रितेश इयत्ता बारावीत होता. जानोरी येथील गणेशोत्सवात जिवंत देखाव्यात रितेश नेहमी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, मावळा यांची भूमिका सादर करायचा, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.