आग्रा (उत्तर प्रदेश) – फतेहाबादमध्ये जुन्या सेप्टिक टँकमध्ये १३ वर्षीय बालकाला वाचविण्यासाठी उतरलेल्या पाच जणांचा विषारी वायूच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ये भाऊ आहेत, तर एक चुलतभाऊ आणि एक शेजारी राहणारा तरूण व एक गावकरी आहे. सरकारने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातात पाच जणांच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तीन दिवसांपूर्वी शौचालयाच्या सेप्टिक टँकसाठी फतेहाबाद परिसरातील प्रतापपुरा गावात एका नागरिकाच्या घराबाहेर आठ फूट खोल खड्डा खोदण्यात आला होता.
या खड्ड्यापासून तीन फूट अंतरावर जुना सेप्टिक टाकी आहे, जुन्या टाकीमधून पाणी गळत होते. ही गळती रोखण्यासाठी 13 वर्षीय मुलगा अविनाश त्या खड्ड्यात उतरला, मात्र जुन्या टाकीमधून विषारी गॅस बाहेर पडल्याने अविनाश आत घसरून पडला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आदित्य ( वय 15 ) हा खड्ड्यात उतरला, तोही बेशुद्ध पडला.
यानंतर मोठा भाऊ हरिमोहन ( वय 17 ) आणि चुलतभाऊ ( वय 30 ) सोनू शर्मा, तसेच शेजारी राहणारा योगेश बघेल ( वय 17 ) या दोन भावांना वाचवण्यासाठी परत खड्डयात गेले. मात्र विषारी वायूने सर्वजण त्या खड्ड्यात गुदमरून अडकले होते.
पाच तरुण खड्ड्यात अडकल्यानंतर आरडाओरड झाली. तेव्हा शेतात काम करणारे पुरुष मजूर तेथे पोहोचले. एका गावकऱ्याने त्या खड्डयातील मुलांना वर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही चक्कर आल्याने तोही त्यात पडला. यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथून आग्रा येथे एसएन मेडिकल कॉलेजमध्ये आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.