नाशिक – कोविड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली असताना खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे अन शिक्षण सुरू ठेवण्याचे मोठेच आव्हान प्रशासनासमोर होते.अशा विषम परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या राजेवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) शाळेत शिक्षक असलेल्या पंकज रमेश दशपुते यांनी सेतुबंध प्रकल्पा अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या २१०० मुलांना सुमारे तीन लक्ष रुपये किमतीच्या वर्षभरासाठीच्या अभ्यासमाला अन पाचशे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पुरवून शिक्षणासाठीच्या प्रेरणेचे काम केले आहे.
टाळेबंदीच्या काळातही समाजातील दानशूरांनी मदतीचा हात पुढे करून ‘शिक्षकांची चळवळ’ बानू पाहत
असलेल्या सेतुबंध प्रकल्पावर दाखविलेला विश्वास वाखणण्याजोगा आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात आला. राज्यात शाळा नियोजीतवेळी सुरू होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर सेतुबंध ग्रूपच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासमाला पुरविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नवनीतच्या अभ्यासमालेवर एकमत होऊन त्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. दशपुते यांनी समाजातील दानशूरांकडे प्रकल्पाची माहिती दिली अन दानशूरांनी थेट अभ्यासमाला खरेदी करून शाळांना सुपूर्द केल्या.
याशिवाय कोरोनामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाच्या आनंदाला मुकलेल्या पाचशे चिमूरड्यांना शालेय दप्तराचे वाटपही करण्यात आले. यासाठी ग्रूपला दरवर्षी मदत करणार्या अॅडम कंपनीने दप्तरे पुरवली. मानव उत्थान मंचच्या मार्गदर्शनाखाली या ग्रूपने उल्लेखनीय कार्य केले असून रोटरी क्लब ग्रेपसिटी नाशिक यांचेही उपक्रमास सहकार्य लाभले.
कोरोना काळात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शाळा सुरु होण्याबाबत गोंधळले आहेत. ऑनलाईन शिक्षण इथे पोहचू शकत नाही याची जाणीव शहरातील दानशूरांना करून देण्यात आली. त्यांच्या मदतीने संपूर्ण वर्षभराची अभ्यासमाला आणि काही विद्यार्थ्यांना दप्तरे देण्याचे नियोजन करण्यात आले.
– पंकज दशपुते, शिक्षक, राजेवाडी जि.प. शाळा