नागपूर – अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपास प्रकरणात महत्त्वाची नवी बाब समोर आली आहे. सुशांत सिंह आणि त्याची बहिण प्रियांका या दोघांमध्ये वाद होते. तो वाद मिटविण्याचा प्रयत्न मी करीत असल्याचे रिया चक्रवर्तीने पोलिसांना सांगितले आहे. तसे वृत्त टीव्ही वाहिन्यांनी दिले आहे. रियाने सुशांतसोबत चॅट केलेले अनेक मेसेज तसेच स्क्रीनशॉट पोलिसांना सुपूर्द केल्याचे वृत्तात म्हटले आहे. यामुळे या तपासाला नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत.
पहिल्यांदाच बोलले गृहमंत्री
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील. या प्रकरणाचा तपास व्यावसायिक पद्धतीने करत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर मध्ये ते वार्ताहरांशी बोलत होते. सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय, केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वीच जाहीर केला आहे. त्यानंतर, देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात पाटणा येथे दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या ११ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यावेळी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल असे देशमुख यांनी सांगितले.