मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या पथकाने तिसऱ्या दिवशी प्रत्येक घटनेची पडताळणी सुरू केली आहे. सीबीआयच्या एसआयटीचे प्रमुख एसपी नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील पथक ही चौकशी करीत आहे. दुपारच्या सुमारास हे पथक वांद्रे येथील माऊंट ब्लॉक अपार्टमेंटमध्ये असलेल्या राजपूत यांच्या फ्लॅटवर पोहचले. तेथे त्यांनी सर्व बाबींची पाहणी तसेच पडताळणी केली. सुशांत यांचा स्वयंपाकी तसेच शेजारी व अन्य व्यक्तींची चौकशी पथकाने केली आहे.
जनहित याचिका फेटाळल्या
मुंबई – सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या विविध जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. सर्वोच्च न्यायालयानं याआधीच सी बी आय चौकशीचे निर्देश दिल्यानं उच्च न्यायालयानं काही निर्णय द्यायचा प्रश्नच उद्भवत नसल्याच मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्त आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या पीठानं म्हटले आहे. राज्य सरकार, मुंबई पोलीस तसंच बृहन्मुंबई महानगरपालिका सी बी आय ला सहकार्य करत नसल्याचं याचिकाकर्त्यांना वाटत होत तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती असंही पीठानं म्हटलं आहे. सी बी आय पथक याआधीच मुंबईत दाखल झालं असून त्यांनी सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला सुरुवातही केली आहे.