मुंबई – हरियाणा येथून लवकरच देशातील पहिली एअर टॅक्सी सुरू होणार आहे. त्यामुळे देशातील मध्यमवर्गियांना हवाई सफर करण्याचे स्वप्नही पूर्ण करता येणार आहे. झज्जर येथील बेरी या गावात कॅप्टन वरुण सुहाग प्रत्यक्षात ते साकारण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
देशातील पहिल्या एअर टॅक्सीची सुरुवात हिसार एअरपोर्टपासून होणार आहे. येथून डेहराडून, चंदीगढ, धर्मशाला या ठिकाणी स्वस्त दरात विमानाने जाऊ शकतील. सुरुवातीला हिसार-चंदीडढ, हिसार-डेहराडून, हिसार-धर्मशाला येथून सर्व्हिस सुरू होणार आहे. २०१५ मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअपला आता रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत एअर टॅक्सी चालविण्याची जबाबदारी भारत सरकारच्या नागरी उड्डयण मंत्रालयाने दिली आहे. सारे काही अंतिम टप्प्यात आहे आणि हिसारवरून ही सेवा सुरू होण्यासाठी लवकरच तारीखही निश्चित होणार आहे. मकर संक्रांतीला पहिले विमान उड्डाण भरेल, अशीही चर्चा आहे. त्याचवेळी आनलाईन बुकींगसाठी संकेतस्थळ देखील लॉन्च होणार आहे. एअर टॅक्सी स्टार्ट अपचे संचालक कॅप्टन वरुण सुहाग यांनी सांगितले की पायलटचे प्रशिक्षण अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात घेतले आहे. तिथे एखाद्या कामासाठी जायचे असेल तर एअर टॅक्सी घेऊन निघून जायचो, असे वरुण सांगतात. भारतात त्यांना त्याची उणीव भासू लागली. अशात त्यांनी कॅप्टन पूनम गौर यांच्यासोबत एक स्टार्ट अप प्लान तयार केला. त्यासाठी त्यांनी एअर टॅक्सी नावाची कंपनी सुरू केली. १० कोटी रुपयांची गुंतवणूक करून हे शक्य झाले. विमानाच्या लक्झरी प्रवासाचा अनुभव भारतातील प्रत्येक व्यक्तिला मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. ज्याप्रमाणे टॅक्सी बुक करतो, तसेच एअर टॅक्सी बुक करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येणार आहे.
चार सीटची एअर टॅक्सी
एअर टॅक्सीने प्रवास करायचा असेल तर अवघ्या दहा मिनीटांपूर्वी एअरपोर्टवर आले तरीही चालणार आहे. एक पायलट आणि तीन प्रवासी टॅक्सीत जाऊ शकणार आहेत. त्यामुळे तीन प्रवासी आले की एअर टॅक्सी लगेच सुटणार आहे. येत्या काळात २६ वेगवेगळ्या मार्गांवर एअर टॅक्सी सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते सांगतात.
असे असेल भाडे
हिसार ते चंदीगड – १७०० रुपये (५० मिनीटे)
हिसार ते धर्मशाळा – २५०० रुपये (दीड तास)
हिसार ते डेहराडून – २५०० रुपये (सव्वा तास)