सुरगाणा – आदिवासी समाज बांधवांच्या प्रयत्नातून पहिला जागतिक स्तरावरचा भव्य सेवाभावी बिरसा मुंडा सामाजिक हॉस्पिटल हे येत्या काळात जनतेच्या आरोग्यसेवेत मोठी कामगिरी करणार असून बिरसा मुंडा हॉस्पिटल हे सर्वसामान्यांच्या आरोग्यसेवेत मोठे हब बनेल असे मत सुरगाणा येथे झालेल्या हॉस्पिटलच्या माहिती अभियान बैठकीत बोलतांना प्रकल्प समन्वयक डॉ.साहेबराव झिरवाळ यांनी प्रतिपादन केले.
यावेळी हॉस्पिटलचे प्रकल्प समन्वयक डॉ.साहेबराव झिरवाळ पुढे म्हणाले की, आदिवासींनी काळानुसार आपल्यात परिवर्तन करणे काळाची गरज आहे. म्हणूनच आदिवासींचे आराध्य दैवत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने नाशिक शहरात म्हसरूळ-पेठरोड शिवारातील ओमकारनगर येथे आदिवासी बांधवांच्या प्रयत्नातून सेवाभावी सामाजिक मेडिकल हब उभे करण्याचे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात समाजातील सर्वांच्या आरोग्य सेवेत दाखल होईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
सदरच्या उपक्रमात, माफक आरोग्यसेवा सुविधा, मेडिकल टुरिझम, रोजगाराच्या संधी, शेअर्स खरेदी-विक्री, सभासदांना लाभांश, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना व्यवसायाच्या संधी, नर्सिंग कॉलेज यांसह व भविष्यकालीन नियोजन व तरतुदी असा मोठा सामाजिक उद्देश असून यासाठी समाजातील जनतेने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्प समन्वयक डॉ.साहेबराव झिरवाळ यांनी केले. यादरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील जेष्ठ नागरिक आनंदा चौधरी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.साहेबराव झिरवाळ होते. यावेळी संचालक डॉ.रामचंद्र थविल, सहसंचालक आर.डी.भोये, जी. डी. पवार, ललित राऊत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश थोरात, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडूरंग पवार, प्राचार्य पी.के. चव्हाण आदींची भाषणे झाली. यावेळी मास्क लावून व फिजिकल डिस्टन्स ठेवून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.