सुरगाणा – येथील पोस्ट कार्यालयात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी कोयंडा तोडून पैशांची लोखंडी तिजोरीच उखडून नेत रोख रकमेसह विविध प्रकारचे तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे इत्यादींसह २ लाख ३५ हजार ७०८ रुपयांची चोरी झाल्याने येथे खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये याच पोस्टात हीच तिजोरी लंपास केली होती.
येथील पोस्ट अधिकारी मनोहर पालवा यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यात रोख रक्कम १ लाख ८० हजार ८०७ रूपयांसह विविध प्रकारची तिकिटे, रेव्हेन्यू तिकिटे, एरोग्रॅम, आयपीओ, पोस्ट कार्ड, १ डीव्हीआर कॅमेरा, बीएसएनएल मॉ॑डम, १ हार्ड डीक्स असा एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे आठ रूपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे म्हटले आहे. बांधकामात असलेली लोखंडी तिजोरी खोलता न आल्याने अज्ञात चोरट्यांनी बांधकाम तोडून तिजोरीच सोबत घेऊन गेले आहेत. तीन चार वर्षांपूर्वी याच पोस्ट कार्यालयात चोरीचा प्रयत्न झाला होता. तर गेल्या वर्षी मार्चमध्ये याच पद्धतीने तिजोरी पळवली होती. सुदैवाने तिजोरी फोडता न आल्याने मोठी रक्कम सही सलामत शहरापासून काही अंतरावर मिळून आली होती. तिसऱ्या वेळी झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोस्टातील पैशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पोस्टातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली होती.