इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी रक्कमेच्या हप्त्या पासून अद्यापही वंचितच
सुरगाणा – तालुक्यातील बारागाव डांग विभागातील ग्रामपंचायत गोंदुणे अंतर्गत पिंपळसोंड येथे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे छप्पर अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत राहीबाई सोमा गावित (वय ५३) या लाभार्थी महिलेचा घरातच मृत्यु झाला असून तिचे पती सोमा गावित (वय ५८) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस पाटील रतन खोटरे यांनी सांगितले की गुरुवारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास राहीबाई व तिचे पती सोमा गावित हे घरात जेवण करत असतांना अचानक पणे इंदिरा आवास योजनेचे घरकुलाचे कौलारू छप्पर, बाटम, लाकडी जाड वासे तसेच सागवान लाकडाच्या वजनदार वळ्या हे साहित्य डोक्यावर कोसळल्याने गंभीर जखमी होऊन राहीबाईचा जागीच मृत्यू झाला तर पतीला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत माजी ग्रामपंचायत सदस्य सोन्या बागुल यांनी सांगितले की,पाच ते सात वर्षापुर्वी सदर लाभार्थी महिलेस इंदिरा आवास योजनेचे घरकुल मिळाले होते. घरकुलाचा पहिला हप्ता लाभार्थी महिलेस मिळाला मात्र पुढील हप्ते अद्यापही मिळालेच नाहीत. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घरकुलाचे बांधकाम पुर्ण करता आले नाही. दुसरे घर नसल्याने अपुर्ण असलेल्या घरातच नाईलाजाने रहावे लागत होते. घरकुलाच्या जोत्यावर (पायावर) पैसे अभावी विट बांधकाम न करता आल्याने अलगदपणे ठेवलेले खांब कोसळल्याने पुर्ण घरच ढासळून जमिनदोस्त झाले. यातच लाभार्थीचा दबून मृत्यु झाला. घरकुलाचे लाभार्थीस हप्ते मिळावे या मागणीसाठी आदिवासी दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष तुळशिराम खोटरे यांनी अनेकवेळा धरणे आंदोलन, आमरण उपोषण, निवेदने सादर केली आहेत मात्र अद्यापही घरकुलाचे लाभार्थी वंचितच आहेत.
या घटनेबाबत तहसिलदार किशोर मराठे यांच्याशी संपर्क केला असता इंदिरा आवास योजनेचे घरकुल अंगावर कोसळून घरातच लाभार्थीचा मृत्यू झाला हि अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून याबाबत घटना मला समजताच तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश तलाठी एम.के. गायकवाड यांना दिले आहेत. या आकस्मिक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. पिंपसोंड हा भाग गुजरात सिमावर्ती लगत असुन अतिदुर्गम आहे. महिलेच्या नातेवाईक मजुरी करीता बाहेरगावी गेले होते. ते आल्यावर रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून शवागारात ठेवण्यात आला आहे.सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.पुढील पोलिस उपनिरीक्षक सागर नांद्रे यांच्या मार्गमार्गाखाली पोलीस प्रभाकर सहारे, चंद्रकांत दवंगे हे करीत आहेत.