सुरगाणा – तालुक्यातील पळसन येथे सोमवारी साडेचार वाजेच्या दरम्यान मोहनाबाई गुलाब देशमुख यांच्या घराला अचानक आग लागून घरासह सर्व साहित्य जळून नष्ट झाल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र लाकडी घर असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर तसेच संसार उपयोगी साहित्य, सर्व कागद पत्रे, कपडे, धान्य जळून खाक झाले आहे. यावेळी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. या आगीत देशमुख कुटुंबीयांचे सर्व काही भस्मसात झाले आहे. आगीत सर्वस्व गमावून बसलेल्या देशमुख कुटुंबीयांना मदतीचे आवाहन करण्यात आले असून अनेकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.