नाशिक – शहरातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग असलेल्या सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. इचलकरंजी जनता सहकारी बँकेची या संचालकांनी फसवणूक केल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यानुसार, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक जयश्री अनंत राजेगावकर, वैशाली अनिल जैन, अनंत केशव राजेगावकर, आकाश अनिल जैन यांच्याविरुद्ध भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४३४ अन्वये सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल तक्रारीनुसार, सुयोजित इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांनी संगनमत करुन इचलकरंजी जनता सहकारी बँकेकडे तारण असलेले मुसळगाव (ता. सिन्नर) येथील मालमत्तावरील बोजा बँकेच्या संमतीविना परस्पर हटविला. यासाठी संचालकांनी बँकेचे खोटे दस्तावेज तयार करुन ते खरे असल्याचे सांगत मुसळगावच्या तलाठी कार्यालयात जमा केले. याची गंभीर दखल बँकेने घेतली आणि सुयोजितच्या संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार सुयोजितच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सिन्नर पोलिस करीत आहेत.