नवी दिल्ली – टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांना पुनर्नियुक्त करण्याचा राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरणाचा (एनसीएलएटी) निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला आहे. या निर्णयानंतर मिस्त्री यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. टाटा समूहाचे मानद चेअरमन रतन टाटा यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे टाटा समूहाच्या मूल्य आणि नैतिकतेवर शिक्कामोर्तब केल्याचं रतन टाटा यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा प्रश्न नाही. माझी अखंडता आणि ग्रुपच्या नैतिक आचरणावर सलग प्रहार करण्यात आले. टाटा सन्सच्या सर्व अपिलांना योग्य ठरवण्याच्या निर्णयानं ग्रुपच्या मूल्य आणि नैतिकतेवर मोहर लावली आहे.”
कंपनीच्या शेअर्समध्ये वद्धी
या निर्णयामुळे टाटा ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वृद्धी पहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये टाटा स्टिलचे शेअर्समध्ये ६.०५ पर्यंत वृद्धी झाली. त्याचप्रमाणे टाटा पावरच्या शेअर्सवर ४.९२ टक्क्यांपर्यंत वृद्धी पहायला मिळाली. टाटा कम्युनिकेशन्सच्या स्टॉकमध्ये ४.११ टक्के तर टाटा मोटर्सच्या शेअर्सवर ३.७८ टक्क्यांची वृद्धी झाली. त्याशिवाय टाटा मेटालिक्समध्ये ३.०८ टक्के, टाटा इन्व्हेसमेंट कॉर्पोरेशनमध्ये २.५९ टक्के, टाटा स्लिट लाँग प्रोडक्शनमध्ये २.५७, टाटा कंझ्युमर प्रॉडक्टसमध्ये २.०४ टक्के, वोल्टासमध्ये २.०१ टक्के आणि टाटा केमिकल्समध्ये १.७७ टक्के वृद्धी पहायला मिळाली.