नवी दिल्ली – हिंदू महिलेचे माहेरच्या व्यक्ती तिच्या संपत्तीचे उत्तराधिकारी मानले जाऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात दिला आहे. तिच्या माहेरच्या व्यक्तींना कुटुंबाच्या बाहेरील व्यक्ती ठरवू शकत नाही. हिंदू उत्तराधिकारी कायद्याच्या कलम १५.१ डीच्या अंतर्गत या व्यक्ती येतील आणि संपत्तीचे उत्तराधिकारीही होऊ शकतील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
न्यायामूर्ती अशोक भूषण यांच्या खंडपीठानं म्हटलं की, कलम १३.१ डी वाचून स्पष्ट होतं की, वडिलांच्या उत्तराधिकाऱ्यांना उत्तराधिकारी मानलं गेलं आहे. ते संपत्ती घेऊ शकतात. परंतु त्यामध्ये महिलेच्या माहेरच्या व्यक्तींना उत्तराधिकारी म्हणून सहभागी करून घेऊ शकता येतं. ते संपत्तीला मिळवू शकतात. तेव्हा माहेरच्या व्यक्ती अनोळखी आहेत किंवा महिलेच्या कुटुंबातले सदस्य नाहीत, असं म्हणता येणार नाही.
काय आहे प्रकरण
जग्नो नावाच्या महिलेला तिच्या पतीकडून संपत्ती मिळाली होती. पतीचा मृत्यू १९५३ मध्ये झाला होता. त्यांना अपत्य नव्हतं. त्यामुळे शेतजमिनीतला अर्धा हिस्सा पत्नीला मिळाला. उत्तराधिकारी कायदा १९५६ ला मूर्त स्वरूप मिळाल्यानंतर कलम १४ अनुसार, पत्नीला संपत्तीचा पूर्ण वारसा हक्क मिळाला. त्यानंतर जग्नो यांनी त्यांच्या संपत्तीसाठी एक करार केला आणि संपत्ती आपल्या भावाच्या मुलांच्या नावावर केली. भावाच्या मुलांनी १९९१ मध्ये स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करून संपत्तीचा हक्क देण्याची मागणी केली. जग्नो यांनी त्याला विरोध न करता संमती दिली.
संमतीपत्राला आव्हान
जग्नो यांनी भावांच्या मुलांना संपत्ती देण्याचं संमतीपत्र दिल्यानंतर त्यांच्या पतींच्या भावांनी (दीरांनी) यास विरोध करत न्यायालयात आव्हान दिलं. एक हिंदू महिला आपल्या माहेरच्या लोकांना सोबत घेऊन संयुक्त कुटुंब करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वडिलांच्या मुलांच्या नावावर संपत्ती केली जाऊ शकत नाही, असा त्यांचा आक्षेप होता. कुटुंबातल्या त्याच लोकांशी तडजोड केली जाऊ शकते ज्यांचा संपत्तीवर पहिल्यापासून हक्क आहे. परंतु न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली. त्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं.
सर्वोच्च न्यायालयानं केली व्याख्या
सर्वोच्च न्यायालयानं हिंदू उत्तराधिकारी कायद्यातील कलम १५.१ डी ची व्याख्या केली आहे. हिंदू महिलेच्या माहेरचे लोक अनोळखी नाहीत. ते कुटुंबातला भाग आहेत. कायद्यामधील कुटुंब या शब्दाचा अर्थ संकुचित घेऊन चालणार नाही. त्याला व्यापक अर्थानं बघायला हवं. त्यामध्ये हिंदू महिलेच्या माहेरच्या लोकांचाही समावेश आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.