दुबई – कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाउन झाले होते. या काळात अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी पगारकपातीसह, कर्मचारी कपातासारखे निर्णय घेतले. मात्र यूएईमधील एका भारतीय उद्योजकानं दानशूरपणा दाखवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. डॉ. सोहन रॉय हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. कोरोनाकाळात केवळ आपल्या कर्मचार्यांनाच पगार दिला नाही, तर त्यांच्या गृहिणीलाही मानधन दिले आहे.
सर्वोच्च न्यायालयानं गृहिणींसदर्भात दिलेल्या निर्णयानं डॉ. रॉय यांना प्रेरणा मिळाली आहे. कोरोनाकाळात घरातील जबाबजारी समर्थपणे सांभाळल्याबद्दल डॉ. रॉय यांनी कर्मचार्यांच्या गृहिणींनाही मानधन देण्याचा निर्णय घेतला. सोहन रॉय यांची कंपनी सध्या पुरुष कर्मचार्यांच्या पत्नींचा डेटा जमवत असल्याची माहिती यूएईतील खलीज टाईन्सनं दिली आहे. कर्मचार्यांनी कंपनीसोबत किती दिवस काम केलं त्यावर त्यांच्या पत्नींचे मानधन ठरवले जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता?
कार्यालयीन काम करण्याच्या तुलनेत गृहिणींनी केलेल्या कामांचं मूल्य कमी झालेले नाही, अशी नोंद सर्वोच्च न्यायालयानं नोंदवून जानेवारीत एका अपघातात मृत्यू झालेल्या दांपत्याच्या नातेवाईकांना मिळणार्या नुकसान भरपाईत वाढ केली होती. दिल्लीत एप्रिल २०१४ साली कारच्या धडकेत दुचाकीस्वार जोडप्याचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश एन. वी. रामणा आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठानं दांपत्याच्या नातेवाईकांना मिळणारी नुकसान भरपाई ११.२० लाखांवरून ३३.२० लाखांवर केली होती. मे २०१४ पासून वार्षिक ९ टक्के व्याजदरानं संबंधित विमा कंपनीला मृत व्यक्तीच्या वडिलांना ही रक्कम द्यायची आहे.