मनाली देवरे, नाशिक
…..
निर्धारीत २० षटकात बलाढ्य मुंबई इंडीयन्स आणि राॕयल चॕलेंजर्स बंगलोर संघाची धावसंख्या समान झाल्याने सुपर ओव्हर मध्ये पोहोचलेला रोमहर्षक सामना सोमवारी राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने जिंकला. या सिझनमध्ये विजयाचा फारसा सूर सापडत नसलेल्या मुंबई इंडियन्सची लोकल आयपीएलच्या यार्डातून धडधडत बाहेर आलीच नाही. त्यामुळे चाहते निराश झाले.
अगदी १६ व्या षटकापर्यंत हा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या सहज हातात होता. परंतु, आधीपासूनच एक बाजू भक्कम पणे लावून धरणार्या मुंबईच्या ईशान किशन (५८ चेंडूत ९९ धावा ) सोबत कायरन पोलार्ड (२४ चेंडूत ६० धावा) फलंदाजीला उतरला आणि हेवीवेट फलंदाजी सुरु झाली. दुसऱ्या डावात मैदानावर दव पडत असल्याने ओलसर होणारा चेंडू गोलंदाजीसाठी डोकेदुखी ठरु शकतो, हे गृहीतक ध्यानात घेवून टाॕस जिंकलेल्या रोहीत शर्माने आज आरसीबीला फलंदाजीसाठी बोलावले होते. झालेही तसेच. ओल्या चेंडूवरची पकड घट्ट करणे आरसीबीच्या गोलंदाजाना जमलेच नाही आणि मग हा सामना बरोबरीत सुटला.
फॉर्मात असलेला रोहित शर्मा आजच्या सामन्यात स्वस्तात बाद झाला आणि पुढे पोलार्ड मैदानात उतरेपर्यन्त जणू काही सर्व संपले असल्यागत मुंबई इंडियन्स तर्फे विजयासाठी कुठलेही प्रयत्न झाल्याचे आजच्या सामन्यात दिसून आले नाही आणि तेच त्यांच्या पराभवाचेही कारण ठरले.
राॕयल चॕलेंजर्सची मजबुत फलंदाजी
पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आज सगळा दबाव झुगारून फलंदाजी केली. संघाची सलामी आणि मधली फळी मजबूत करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी मोठी बोली लावून संघात घेतलेला ऑस्ट्रेलियाचा एराॕन फिंच (३५ चेंडूत ५२ धावा) आणि दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स (२४ चेंडूत ५५ धावा) या दोन खेळाडूंनी आज धमाकेदार फलंदाजी केली. डावाच्या सुरुवातीला देवदत्त पडीकल आणि शेवटच्या काही चेंडूवर शिवम दुबेने केलेल्या तुफान फटकेबाजी मुळे २०१ धावांचे मोठे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला मुंबई इंडियन्स समोर ठेवता आले.
विराट पुन्हा अपयशी
सुनील गावस्करने केलेल्या वादग्रस्त काॕमेन्ट्सला विराट कोहली आज आपल्या बॕटने उत्तर देईल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु, विराट पुन्हा अपयशी ठरला. त्याच्या ३ डावात फक्त १८ धावा आहेत. अर्थात त्याचे हे अपयश आज संघातील इतर फलंदाजानी केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे झाकले गेले असले तरी तरी कमबॕक करण्यासाठी विराटला गांभीर्याने विचार करावा लागेल.
मंगळवारचा सामना
किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग या दोन्ही मातब्बर संघाना पराभूत करून पुढे आलेला ‘दिल्ली कॅपिटल्स’ आणि साखळीतल्या दोन्ही सामन्यात पराभूत झालेल्या ‘सनरायझर्स हैदराबाद’ या दोन्ही संघात मंगळवारी संध्याकाळी अबुधाबीत सामना होईल. सहाजिकच आहे, या सामन्यात जो काही दबाव असेल तो सनरायझर्स हैदराबाद संघावर. कारण, या स्पर्धेमध्ये गुणांचे खाते उघडण्यासाठी या संघाला कदाचित या सामन्याकडेच बघावे लागेल.