नवी दिल्ली – आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर मनोराज्य गाजविणारे बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज याबाबत घोषणा केली.
प्रकाश जावडेकर म्हणाले की, देशातील सर्व भागातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना यापुर्वी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आता प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.
रजनीकांत यांना सर्वात पहिला चित्रपट १९७५ मध्ये वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी मिळाला होता. ‘अपूर्व रागंगल’ कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना एक छोटी भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती.
रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यांचे चाहते पहाटे पासून चित्रपटगृहांबाहेर रांगा लावतात. रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या स्वागतासाठी वाजत गाजत मिरवणुका निघतात.
दरम्यान, चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या हनुमान मंदिरात स्टंट्सचा सराव करत असत. रजनीकांत हे अभिनेते कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत. प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात विश्रांतीसाठी जातात. त्यांच्या १९७८ साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणात येण्याची घोषणा केली होती.
https://twitter.com/PrakashJavdekar/status/1377484564965253121