चित्रांकन सुगीच्या हंगामाचे!
लहानपणी पाठ्यपुस्तकात कविता होती. दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले, शेतकरी मग प्रसन्न झाले… हे काव्य वारली चित्रशैलीत साकार होते. कृषिवल आदिवासी बांधवांसाठी सुगीच्या हंगामातील प्रत्येक क्षण हा दिवाळी सारखाच असतो. दसऱ्यानंतर सुरु होणारा सुगीचा हंगाम दिवाळीनंतरही काही काळ आनंद देतो. सुगीच्या वेळी वारल्यांंना जराही उसंत नसते. पिकलेले तांदळाचे दाणे शेतातून खळ्यात व खळ्यावरुन घरात नेण्याची लगबग सर्वत्र सुरु असते. वारली चित्रशैलीत सुगीच्या हंगामाचे चित्रांकनही अतिशय बहारदार केले जाते. त्यातून सुगीचे प्रसंग, घटनांना चित्ररूप मिळते.
ठाणे, नाशिक या आदिवासी बहुल जिल्ह्यातील कृषिवल वारली जमातीचे प्रमुख पीक म्हणजे भात! त्याबरोबरच नागली, वरई, उडीद व इतर काही पिके घेतली जातात. आभाळाचा वेध घेत मे महिन्याच्या अखेरीस जमिनीचा राब केला जातो. पहिला जोमदार पाऊस येताच पेरणीची धांदल सुरु होते. उत्साहात लावणी, आवणी करताना श्रावण उजाडतो. मे – जूनच्या विशिष्ट कालावधीत भाताची पेरणी झाली तर वर येणारी रोपे चांगली तग धरतात. ठाणे, नाशिक जिल्ह्यातील भातशेतीचा हंगाम ९० ते १४५ दिवसांचा असतो. हळवे भात १०० ते ११५ दिवसात तयार होते. गरवे भात पिकायला १२५ ते १४५ दिवस लागतात. पीक तयार होताच भात कापणीची लगबग सुरु होते. यंदा सुरुवातीला दमदार पाऊस झाल्याने भात, नाचणी, वरई यांनी आशा पल्लवीत केल्या. पण नंतर दडी मारलेल्या पावसाने अखेरच्या परतीच्या टप्प्यात बरसून दाणादाण उडवली. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली. उशिरा आवणी केलेले शेतकरी नशीबवान ठरले.त्यामुळे कापणीला आलेले भात वाचवण्यासाठी बळीराजाला शर्त करावी लागली. तरीही खचून न जाता हाती लागलेल्या धान्याची, भाताची सोंगणी, झोडणी, मळणी उत्साहात सुरू आहे. सध्या सर्वत्र सुगीचे दिवस गजबजलेले दिसतात. कणसांंमध्ये दाणे भरायला लागले की शेतात पाखरांचे थवे भिरभिरतात. त्यांना हाकलून लावण्यासाठी गोफण फिरतात. ठिकठिकाणी बुजगावणी उभी राहतात.
दसऱ्यानंतर कापणीला वेग येतो. दिवसभर कापलेले भात सकाळच्या वेळी झोडपले जाते. धान्याची रास आणि बळीराजाच्या चेहऱ्यावरचे समाधान वाढतच जाते. भाताच्या पेंढ्यांंवर पेंढ्या पडतात. भात वेळीच कापले नाही तर पीक येऊनही वाया जाते. भात कापणी इतकेच पुढचेही सोपस्कार महत्वाचे असतात.भातानंतर गवताची गंजी पूर्ण होत नाही तोपर्यंत शेतकरी शांत बसत नाही. हल्ली खळ्याची प्रथा कमी होतेय. उभ्या शेतातच सर्व सोपस्कार पूर्ण केले जातात. नव्या धान्याची मनोभावे पूजा केली जाते. आनंद व्यक्त करण्यासाठी रात्र रात्र तारपानृत्य होते. वाजतगाजत घरी आणलेल्या भाताची पुन्हा पूजा करून कणगीत भरले जाते.कणगी म्हणजे बांबूची भली मोठी टोपली. शेणामातीने लिंपून ती मजबूत केलेली असते. हल्ली बऱ्याचशा आदिवासी पाड्यांवर देखिल बांबूच्या कणगीची जागा प्लास्टिकच्या टोपल्यांंनी, पिशव्यांनी घेतली आहे. जे पर्यावरणाला घातक आहे. निसर्ग बदलतो आहे. शेती व शेतकरीही बदलत चालले आहेत. शेतीचे परिमाण बदलतेय. अर्थात या साऱ्याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. यामध्ये संपत नाही तो उत्साह ! तो आनंदच दिवाळीची रंगत वाढवतो.सुगीच्या हंगामाचे चित्रांकन वारली चित्रशैलीत तेवढ्याच बहारदारपणे केले जाते. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी या विषयावर विपुल प्रमाणात चित्रे रेखाटली आहेत. त्यात शेती, पेरणीपासून पीक येईपर्यंतचे सगळे टप्पे,खळे,भात झोडपणी, भाताचे चोंढे, धान्याची रास, बैलगाडीतून धान्याची वाहतूक,भाताच्या भल्यामोठ्या कणग्या, सर्वांना झालेला आनंद, तृप्त झालेले पशुपक्षी यांचे चित्रण आढळते.
आदिवासी वारली कलेच्या कक्षा नेहमीच रुंदावत असतात. त्या त्यांच्या दररोजच्या जगण्यापासून, सांस्कृतिक जीवनापासून वेगळया करताच येत नाहीत.साधेपणा, सुंदरता, उत्स्फूर्तता आणि उपयोगीता ही आदिवासी कलेची वैशिष्ट्ये आहेत. आदिवासींचा जीवनविषयक दृष्टिकोन साधासरळ असल्याने त्यांची कला देखील साधीसोपी आहे. आकारांचे सुलभीकरण करुन त्यांनी ती कोणालाही जमेल अशी अधिकच सोपी केली आहे. निसर्गाच्या सतत सानिध्यात असल्याने भोवतालच्या पर्यावरणातील विविध आकार त्यांना चित्र रेखाटण्यासाठी प्रेरणा देतात. आदिवासी वारली चित्रशैलीत साधेपणाबरोबरच मोकळेपणाही आहे. ही कला साचेबद्ध नसून तिच्यात लवचिकता आहे. वारली चित्रांमधली निरागसता स्वाभाविक व खरी वाटते. आदिवासी भागात निसर्गपूजा हाच त्यांचा खरा धर्म आहे. वाघदेव हे त्याचेच प्रतिक असून वसुबारसेच्या दिवशी आदिवासी बांधवांनी वाघबारस साजरी करून यंदाच्या दिवाळीला प्रारंभ केला. वाघ्यादेव हे अनेकांचे कुलदैवत असते.एक महिन्यापासून रानात पारधीला गेलेले देव याच दिवशी परत येतात अशी त्यांची श्रद्धा आहे. यंदा झालेगेले विसरून गाणी गात, नृत्य करीत दिवाळीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पालघर जिल्ह्यातील पाड्यांवर दिवाळीपूर्वी आठ दिवस आधी आठोंगण सण साजरा करण्याची प्रथा आहे. यावेळी राखेने रांगोळी काढली जाते. तिला लक्ष्मणरेखा असेही म्हणण्यात येते. त्यात सूर्य, चंद्र, चांदण्या, गाईची पाऊले,नांगर, विळा, कुऱ्हाड, शिडी, झाडे आणि माणसे रेखाटतात. एकूणच सर्वत्र सुगीच्या हंगामाची दिवाळी उत्स्फूर्तपणे उत्साहात सुरु आहे. ती चित्रबद्ध होत आहे.
घांगळीच्या सुरावटीवर दिवाळीची धूम…
सुगीच्या हंगामात दिवाळीच्या दिवशी घांगळी या वाद्याची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते.त्याच्या सुरावटीवर दिवाळीची धूम सुरु असते. रुद्रविणेसारखा आकार असणारे घांगळी हे वाद्य आदिवासी भूमातेचा प्रसाद मानतात. हे तंतुवाद्याचे आद्यरुप आहे. उपलब्ध साधनसामग्रीच्या आधारे या वाद्याची निर्मिती करण्यात येते. दोन भोपळ्यांच्या बैठकीवर हे तंतुवाद्य बांधले जाते. काही ठिकाणी त्याला झांगळी असेही म्हणतात. डाव्या हाताने छातीशी घट्ट धरून उजव्या हाताने तारा छेडल्या जातात. ज्यावेळी शेतातून खळ्यावर धान्य विशेषतः भात आणतात तेव्हा कणसरी व धरणीमातेचे आभार मानण्यासाठी घांगळी गायन होते. त्यात पारंपरिक कथा असते. घांगळी हा आदिवासींचा देवही आहे. उत्तम बांबू निवडून तो दोन भोपळ्यांना जोडला जातो. त्यावर तारा ताणून बसविणे हे कौशल्याचे काम आहे. बांगडीचा किंवा काचेचा तुकडा अथवा नखाने तारांवर आघात करून वाद्यवादन करतात. वाजविणाऱ्याला घांगळी भगत म्हटले जाते. त्याच्या सुरावटीवर नृत्यात रंग भरले जातात. घांगळी वादनाचे प्रशिक्षण पावसाळ्यापूर्वी देण्यात येते. वाद्यनिर्मिती करणारे व प्रशिक्षण देणारे वृद्ध, जाणकार वारली असतात. वाजवणारे कडक नियम पाळतात. अलीकडे तारप्याचे जे झाले आहे तीच कथा घांगळीची आहे. बनविणारे व वाजवणारे दिवसेंदिवस कमी होत आहेत. ही परंपरा टिकली पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.