नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलचे नुसते नाव जरी उच्चारले तरी काही जण नापसंती दाखवितात किंवा नाके मुरडून नावे ठेवतात. सध्या कोरोनाच्या काळात तर अनेक जण विनाकारणच अफवा उठवितात. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे उपचार मिळू शकतात हे स्पष्ट होत आहे. कोरोना बाधित गर्भवती महिलांची अत्यंत चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात असून गेल्या ५ महिन्याच्या ६२ कोरोना बाधित महिलांची सुरक्षित प्रसूती करण्यात आली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना सिव्हिल हॉस्पिटलसह अनेक खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. काही ठिकाणी चांगले उपचार मिळतात, तर काही ठिकाणी रुग्णांच्या तक्रारी येत आहेत, असे सांगण्यात येते. अशा परिस्थितीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार तसेच त्यांची देखभालही घेतली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः प्रसुती विभागात दाखल झालेल्या गरोदर महिलांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर विशेष काळजी घेण्यात येत आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले की, आमच्या रुग्णालयातील प्रसुती विभागात गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सहा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक कार्यरत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. सर्वत्र कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असताना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या अनेक महिलांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे अशा महिलांसाठी स्वतंत्र पणे २० बेडची व्यवस्था करण्यात आली. तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचार्यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
गेल्या पाच महिन्यात अशाप्रकारे ६२ महिलांची यशस्वीरीत्या प्रसूती झाली आहे. विशेष म्हणजे सर्व माता व बालके सुरक्षित आहेत. केवळ एकच दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे मे महिन्यात प्रसूतीसाठी आलेल्या एका ८ महिन्याच्या गर्भवती महिलेची प्रकृती खालवली होती. तिला उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. मात्र अन्य गर्भवती महिला, प्रसुती झालेल्या माता आणि नवजात बालके यांची प्रकृती उत्तम असल्याचे सैंदाणे यांनी स्पष्ट केले आहे.