हर्षल भट, नाशिक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशोत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करणे अशक्य आहे. काहींनी तर घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यासही विरोध दर्शवला. परंतु सण-उत्सव आपली परंपरा असून त्यात खंड पडू नये यासाठी नाशिकच्या सृष्टी शिरवाडकर हिने ‘सुखकर्ता’या अनोख्या संकल्पनेतून गणेशोत्सवाची वेगळी ओळख करुन दिली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘सुखकर्ता’ ही शॉर्टफिल्म लोकप्रिय ठरते आहे.
कोरोनाच्या सावटाखाली यंदा सार्वजनिक गणेशोत्सव झाकोळला गेला आहे. घरगुती गणेश उत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा होत आहे. या उत्सवादरम्यान कोरोनाचा विषाणू घरात येईल, अशी भीती अनेकांना होती. परंतु शासनाचे सर्व नियम पाळून गणेशोत्सव साजरा करता येतो हा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. बाप्पाची मूर्ती घेतांना व विसर्जित करतांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे, नियमित मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे असे सर्व नियम पाळून उत्साहात गणेशोत्सव साजरा करता येवू शकतो असा या शॉर्ट फिल्ममधून संदेश देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या निमिताने सर्वजण निरनिराळे उपक्रम करत असतांना सृष्टीच्या नवख्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात पसंती मिळते आहे. सृष्टी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिला अभिनयाची आवड असल्याने नाविन्यपूर्ण संकल्पना शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून मांडत असते. यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना नाशिकमधील बाजारपेठ, घरगुती तयारीचे अतिशय सुरेख चित्रीकरण केले आहे. विघ्नहर्ता विनायक यंदा ‘सुखकर्ता’ म्हणून सर्वांच्या घरी आलेला आहे. कोरोनाचे संकट दूर करणारा आशावाद सृष्टीने ‘सुखकर्ता’ फिल्ममधून मांडला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना घ्यावयाची काळजी या शॉर्टफिल्मद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाने दिलेले सर्व नियम पळून पूर्ण सुरक्षेच्या आधारे आपण आपले सण उत्सव साजरे करू शकतो असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. देवाची मूर्ती घरात आणल्याने कोरोना होणार नाही, मुळात बाप्पा विघ्नहर्ता असल्याने त्याच्या येण्याने सर्व विघ्न दूरच होणार.
– सृष्टी शिरवाडकर, अभिनेत्री
येथे पहा ‘सुखकर्ता’ शॉर्ट फिल्म https://youtu.be/FT3omaUCH8o