मुंबई – ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका यांनी विकसित केलेली कोरोना लस भारतात कोविशिल्ड ब्रँड नावाने तयार करून विकली जाते. मात्र कोरोना लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्याबद्दल अॅस्ट्रॅजेनेका कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. त्यामुळे सीरमने कोवीशील्डचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी अनुदान स्वरूपात भारत सरकारकडे मदतीकरिता धाव घेतली आहे.
या संदर्भात माहिती देताना सीरमचे सीईओ अदर पूनावाला म्हणाले की, कोविड -१९ लसीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी आम्हाला सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून ही रक्कम आम्हाला मदत म्हणून मिळावी. कारण आम्ही आधीच हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत, आता आम्हाला लस उत्पादन क्षमता वाढवण्याचे इतर नवीन मार्ग शोधावे लागतील. कोविशिल्ड लसीची उत्पादन क्षमता जूनपासून दरमहा ११ कोटी डोस होण्याची कंपनीची अपेक्षा आहे.










