नवी दिल्ली – सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणखी चार लसींवर संशोधन सुरू आहे, अशी माहिती सीरम संस्थेचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी दिली आहे. त्यामुळे कोविशिल्ड पाठोपाठ आणखी चार कोरोना लस इन्स्टिट्यूटकडून उपलब्ध होणार आहेत.
जाधव यांनी सांगितले की, कंपनी कोविशिल्डसह कोरोना विषाणूच्या चार लसींवर काम करत आहे. सध्या कोविशिल्डच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली असून लसीकरण मोहिमेमध्ये ही लसदेखील आणली जाणार आहे. तसेच तीन लसी क्लिनिकल अभ्यासाच्या विविध टप्प्यात आहेत, तर एक लस सध्या चाचणीच्या पूर्व-क्लिनिकल टप्प्यात आहे.
अमेरिकन औषधनिर्माण कंपनीशी करार : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने भारतासह इतर देशांसाठी संभाव्य कोरोना लस तयार करण्यासाठी अमेरिकन औषधनिर्माण कंपनी नोव्हावाक्स इंकशी करार केला आहे. करारानुसार, सीरम संस्था दरवर्षी नोव्हावाक्सच्या दोन अब्ज डोस तयार करणार आहे. सीरमने आपली कोरोना लस तयार आणि वितरण करण्यासाठी अमेरिकन कंपनी कोडगेनिक्सशी करार केला आहे.
देशात कोरोना लसीकरण सुरू झाले
चार लाख लोकांना लस : सीरम संस्थेच्या भारतातील कोविशिलड लस मंजूर झाल्यानंतर लसीकरण देखील सुरू झाले आहे. दि. 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात आतापर्यंत सुमारे चार लाख लोकांना लसी देण्यात आली आहे.
या दोन्ही लसींना मंजुरी : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांनी देशात दोन कोरोना लस मंजूर केल्या आहेत, एक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि दुसरे म्हणजे बायोटेकची कोवाव्हॅसिन होय.
रुग्ण संख्येत घट : सध्या भारतात कोरोनाच्या नवीन घटनांमध्ये घट दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, दररोज सुमारे 14 हजार नवीन रुग्ण देशामध्ये आढळून येत आहेत, त्यापेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण रोज बरे होत आहेत.