नवी दिल्ली – पूर्व लडाख परिसरात भारत आणि चीन सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. रेझांग ला येथील मुखपरी येथे चीनी सैन्याने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हा गोळीबार भारतीय सैन्याने केला आणि भारतीय सैन्य हे चीनी हद्दीत घुसखोरी केल्याचा कांगावा चीनचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने केला आहे. मात्र, भारतीय सैनिक भारतीय भूमीचे संरक्षण करण्यात कटीबद्ध असून कुठल्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. मात्र, चीनी सैन्याने हवेत गोळीबार केल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सीमेवर तणाव आहे. त्यातच भारत आणि चीन यांच्या संरक्षणमंत्र्यांची रशियातील मॉस्को येथे नुकतीच भेट आणि चर्चा झाली. त्यामुळे एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे सीमेवर घुसखोरी आणि हालचाली करायच्या असाच चीनचा कावा असल्याचे दिसून येत आहे. पूर्व लडाखमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास ५० ते ६० चीनी सश्स्त्र सैनिक भारतीय चौक्यांजवळ आले. त्यांनी भारतीय सैनिकांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवानांनी त्यास चोख उत्तर दिले. चीनी सैन्याने माघारी फिरताना गोळीबार केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लष्कराने दिली ही माहिती
भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारत, वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी)सैन्य मागे घेण्यास आणि संघर्षाची तीव्रता कमी करण्यास वचनबद्ध आहे, तर चीन ती वाढविण्यासाठी चिथावणीखोर कारवाया करीत आहे. भारतीय सैन्याने कोणत्याही टप्प्यावर वास्तविक नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही किंवा गोळीबार करण्यासह कोणत्याही आक्रमक पद्धतीचा अवलंबही केलेला नाही. मुत्सद्दी व राजकीय पातळीवर गुंतलेली कामे प्रगतीपथावर असताना, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून उघडपणे करारांचे उल्लंघन केले जात असून आक्रमक उपाययोजना केली जात आहे. अलिकडेच ७ सप्टेंबर रोजी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी आपल्या एका चौकीकडे जाण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या जवानांना त्यांना रोखण्यात यश आले. आपल्या सैन्याला धमकाविण्याच्या प्रयत्नात पीएलएच्या सैन्याने हवेत काही फैरी झाडल्या. या तीव्र चिथावणीनंतरही आपल्या सैन्याने मोठा संयम, जिद्द आणि जबाबदारीचे दर्शन घडविले आहे. भारतीय सैन्य हे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध आहे, परंतु, त्याचवेळी ते सर्व तऱ्हेने राष्ट्रीय अखंडता आणि सार्वभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी देखील दृढ आहे. वेस्टर्न थिएटर कमांडरने जारी केलेले निवेदन त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.