मुंबई – स्फोटके सापडलेली कार, माजी आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटरबॉम्ब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील गंभीर आरोप असो की पोलिस अधिकारी सचिन वाझे याचा गौप्यस्फोट या सर्व प्रकरणात अखेर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. या प्राथमिक चौकशीत आतापर्यंत चार जणांचे जबाब नोंदविण्यात आले असून यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे, तक्रारदार डॉ. जयश्री पाटील आणि एसीपी संजय पाटील यांचा समावेश आहे.
सीबीआयने या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू करावी, अशी मागणी करणारी याचिका डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आणि सीबीआयला १५ दिवसात अहवाल देण्याचे सांगितले. तर, या निकाला विरोधात देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यानंतर आता सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.
मुंबई पोलिसांनी सरकारला पाठवलेल्या गोपनीय चौकशी अहवालात म्हटले आहे की, सचिन वाझे यांचे निलंबन मागे घ्यावे व वाझेला सीआययू प्रमुख बनवायचे असा परमबीर सिंग यांचा निर्णय होता. दरम्यान, कोर्टानेही सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
एनआयएने सचिन वाझे यांच्या वैयक्तिक ड्रायव्हरची चौकशी केली होती. तसेच त्यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गुन्हेगारी इंटेलिजेंस युनिट (सीआययू) मध्ये प्रभारी असलेले एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची चौकशी केली. त्याचप्रमाणे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केला.
विशेष म्हणजे एनआयएमार्फत चौकशीसाठी बोलविण्यात आलेल्या प्रदीप शर्माचे नाव प्रथमच या प्रकरणात समोर आले आहे. २००४ मध्ये सचिन वाझे यांनी प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात अंधेरी सीआययू युनिटमध्ये काम केले होते. सचिन वाझे यांच्या कोठडीत वाढ करण्याकरिता कोर्टाकडे अपील करतांना एनआयएच्या वकिलांनी म्हटले आहे की, अँटिलिया स्कॉर्पिओ घटनेच्या कटात मनसुख हिरेनही सहभागी होता. या व्यतिरिक्त वाझे यांच्या बॅंक खात्यात दीड कोटी रुपयांची माहितीही मिळाली असून या प्रकरणांमध्ये वाजे यांच्याकडून अधिक माहिती गोळा करण्याचे काम बाकी आहे, त्यामळे त्याच्या कोठडीत वाढ करण्याचे सांगण्यात आले.