तिरुवनंतपुरम – न्यायालयीन प्रक्रियेतील विलंब कसे एखाद्या कुटुंबाचे हाल करतो याची प्रचिती देणारी आणखी एक घटना समोर आली आहे. केरळ येथे तिरुवनंतपुरम येथील सीबीआय न्यायालयाने एका प्रकरणात तब्बल २८ वर्षांनंतर निर्णय दिला. परंतु, हा न्याय निर्वाळा ऐकण्यासाठी पीडितेचे आई-वडील हयात नाहीत. कारण पीडितेच्या आई-वडिलांचा न्यायालयाच्या पायऱ्या झिजवतानाच मृत्यू झाला.
२१ वर्षीय सिस्टर अभया हिच्या खुनाच्या प्रकरणात न्यायालयाने पादरी आणि ननला दोषी ठरविले आहे. सिस्टर अभयाचा मृतदेह १९९२ ला कोट्टायमच्या एका कॉन्व्हेंटमध्ये विहीरीत आढळला होता. फादजर थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. सिस्टर अभयाचे शव या कॉन्व्हेंटच्या विहीरीत आढळले त्याच कॉन्व्हेंटमध्ये ती राहायची. आपल्या लेकीच्या खुनाच्या दोषींना शिक्षा होईल या प्रतिक्षेत अभयाचे आई-वडील होते. मात्र काही वर्षांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अभयाच्या भावाने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘ईश्वर महान आहे. माझ्या बहिणीला न्याय मिळाला आहे’, असे तो म्हणाला. सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते जोमन पुथनापुरक्कल यांनी एकट्याच्या भरवश्यावर प्रकरण हाताळले, हे विशेष. त्यांनी म्हटले की या निर्णयामुळे चर्चच्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले आहे. कारण या अधिकाऱ्यांनी प्रकरण दाबायचा प्रयत्न केला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार घटनेच्या दिवशी अभया अभ्यास करण्यासाठी पहाटे लवकर उठली होती. चेहरा धुण्यासाठी ती स्वयंपाक घराच्या दिशेने गेली असता तिने पादरी आणि नन यांना अतिशय विचित्र अवस्थेत एका खोलीत बघितले.
दोघांनीही बदनामीच्या भितीने अभयाला मारून टाकले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशांनी सिस्टर अभयाला खोट्या आरोपांमध्ये फसविण्याचा प्रयत्न केल्याचीही टिका करण्यात आली होती. १९९२ मधील या घटनेचा तपास सीबीआयने २००८ मध्ये आपल्याकडे घेतला. पादरी आणि नन यांच्यातील अनैतिक संबंधांबद्दल सिस्टर अभयाला कळल्यामुळे तिचा खून करण्यात आला. तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याचेही स्पष्ट झाले होते. हल्ला करून ती मृत असल्याची खात्री पटताच तिचा मृतदेह विहीरीत फेकून देण्यात आला होता. मात्र एवढी मोठी घटना घडूनही चर्चने आरोपींना निर्दोष ठरविले होते. अभयाची आत्महत्या सिद्ध करण्याचाही प्रयत्न झाला, पण न्यायालयाने तो प्रयत्न धुडकावून लावत नव्याने तपासाचे आदेश दिले होते.