नाशिक – शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्याच अनुषंगाने शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी आणखी ५० बेड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाअंतर्गत हे बेड्स उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांनी सांगितले आहे.
शहरात कोरोनाचा विळखा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्याच धरतीवर शहरात सर्वत्र टेस्टिंग प्रमाण वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. यावर उपाय म्हणून शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी ५० बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी याआधी १०० बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता आणखी ५० बेड्स अतिदक्षता विभागाअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती रावखंडे यांनी दिली आहे. तसेच १० गर्भवती महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. ५५ टक्के कोरोना रुग्ण हे शहरी भागातील असून उर्वरित ४५ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही नागरिकांनी लक्षणे आढळताच स्वतःहून कोरोना चाचणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.