नाशिक – कोरोना हा निरंतर चालणारा आजार असून त्यावर शाश्वत उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) ऑक्सिजन सेंटर्सची निर्मिती करणे गरजेचे आहे. ते करण्यासाठी तात्काळ ई-निविदेच्या माध्यमातून तात्काळ काम सुरू करावे, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कोरोना आढावा बैठक झाली. त्यात प्रामुख्याने ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कुठल्याही पेशंटला ऑक्सिजनची कमतरता सद्यस्थितीत भासणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर्सची संख्याही येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्धता वाढविण्यासाठी नियोजन करावे. कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन भासेल या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
तर भीती निर्माण होईल
पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, बेड उपलब्ध असूनही नागरीकांपर्यंत त्याची माहिती पोहचविण्याची प्रणाली गरजेप्रमाणे निर्माण करून त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा तसेच त्याचे वेळोवेळी मुल्यमापन केले नाही तर लोकांमध्ये असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण होते. वैद्यकीय सुविधा व त्याची आवश्यकता यावरील किती व कशी ? यासाठी लोकांमध्ये जनजागृतीही करण्याची गरज आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.
ऑक्सिजनचे २ टँकर्स उपलब्ध होणार
ऑक्सिजनच्या तुटवड्याबाबत वारंवार प्रसारमाध्यमांमधून चर्चा होत आहे परंतु जिल्ह्यात सध्या प्रत्येक रूग्णासाठी ७ ते ८ लिटर पर मीटर इतका ऑक्सिजन गरजेचा आहे. आज जिल्ह्यात जवळ जवळ एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन ऑक्सिजन लागत असून आपल्याकडे तो ४३ मे.टन इतका उपलब्ध आहे. यातील ऑक्सिजनचा पुरवठा प्रामुख्याने वैद्यकीय प्रयोजनासाठी वापरण्यात यावा व वैद्यकीय कारणासाठी पुरेसा उपलब्ध आहे, याची खात्री झाल्यानंतरच अन्न व औषध प्रशासनाच्या व उद्योग केंद्रांच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगासाठी त्याचे व्यवस्थापन करावयाचे आहे. दैनंदिन ऑक्सिजन वाहतुकीसाठी टॅंकर्सची आवश्यकता असून त्यासाठी तात्काळ आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी दररोज ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी २ टॅंकर्स पुरवण्याची ग्वाही दिली आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.