नाशिक – त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना चाचणी केंद्राचे उदघाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी (७ ऑगस्ट) होणार आहे. सायंकाळी हा समारंभ होणार आहे. खासदार हेमंत गोडसे यांच्या निधीतून हे केंद्र साकारण्यात आले आहे. या उदघाटन समारंभप्रसंगी पालकमंत्री सिव्हिल हॉस्पिटलमधील सुविधांची पाहणी करणार आहेत. तसेच, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
पालकमंत्री शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर असून सकाळी ११ वाजता ते भावली धरणाच्या ठिकाणी जलपूजन करणार आहेत. सध्या भावली धरण पूर्णपणे भरले आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईचे वातावरण असताना भावली धरण भरल्याने ते जलपूजन करणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच लागला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे कौतुक आणि त्यांचा सत्कार दुपारच्या सुमारास भुजबळ फार्म येथे केला जाणार आहे.
असा होणार फायदा
प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणी केंद्र उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले. त्यानंतरच खासदार हेमंत गोडसे यांनी स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांचा निधी केंद्रासाठी उपलब्ध करुन दिला. तीन महिन्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर चार दिवसांपूर्वी केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे. केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी दोन दिवसांपूर्वी मिळाली आहे. या केंद्रामुळे जिल्ह्यातील रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी धुळे, पुणे येथे पाठविण्याची गरज पडणार नाही. तसेच, अवघ्या दोन तासात स्वॅब तपासणी अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.