नाशिक – सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांसह तब्बल १३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी हे कार्यालय बंद करण्याची वेळ सिव्हिल प्रशासनावर आली आहे.
त्र्यंबकरोडवरील सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासकीय कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (दि. २५) या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर ४ लेखनिकही बाधित असल्याचे शुक्रवारच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हॉस्पिटल आवारातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय कार्यालय काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबरोबरच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांनीही त्यांची वैद्यकीय चाचणी केली आहे.
कोरोना योध्दा असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करीत आहेत. स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू केल्यानंतर प्रत्येक डॉक्टर तसेच कर्मचाऱ्याची या ठिकाणी सेवा अनिवार्य करण्यात आली आहे.
दरम्यान काही दिवसांपुर्वी कोरोना कक्षात उपचार करणारे डॉक्टर, परिचारीका व कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावर मात करीत कर्मचारी पुन्हा रुग्णसेवेस लागले आहेत. प्रशासकीय कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नागरिकांच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात आहे. येथील कोरोना नियंत्रणात येईपर्यंत प्रशासकीय कार्यालय काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.