नाशिक – गॅस गळतीतून झालेल्या सिलेंडर स्फोटात गंभीर भाजलेल्या २८ वर्षीय युवकाचा मंगळवारी (दि.६) मृत्यु झाला. या घटनेत आजतगायत पाच जणांचा बळी गेला असून, त्यात दोन महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. वडाळानाका भागातील संजरीनगर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात आठ जण भाजले होते.
शोएब वलीउल्ला अन्सारी असे उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या युवकाचे नाव आहे. इगतपुरीवाला चाळीच्या पाठीमागील बाजुस असलेल्या संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये गेल्या शुक्रवारी हा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. यामध्ये दोन महिला व दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या शोएब वलीउल्ला अन्सारी (28) याचाही सकाळी मृत्यु झाला. त्याच्या मृतदेहावर शोकाकुळ वातावरणात दुपारी दफनविधी करण्यात आला. आतापर्यंत झालेल्या पाच मृत्युच्या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.