नाशिक – व्यावसायिक गॅसचा घरगुती वापर करीत असतांना गळती होऊन झालेल्या सिलेंडर स्फोटात गंभीर भाजलेल्या चौघांचा मृत्यू झाला. हा स्फोट वडाळा गावातील भारतनगर भागात झाला होता. मृतांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेत सहा जण भाजले होते.
रशीद लतिक अन्सारी (३०), मोहम्मद अमजद अब्दूल रौफ अन्सारी (३०), मोहम्मद मुर्तजा अन्सारी (३०) व मोहम्मद अफताफ आलम (१९ रा.सर्व रूम नं.४ मस्जिद पाठीमागील गल्ली, भारतनगर) अशी मृतांची नावे आहेत.
वडाळा रोडवरील भारतनगर झोपडपट्टीत मंगळवारी (१ डिसेंबर) गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात परिसरात आगीचे लोट पसरले होते. या घटनेत आगीने अनेक घरांना लक्ष केल्याने सहा जण भाजले होते. परिसरातील नागरीक आणि पोलीसांनी जखमींना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले होते.
तब्बल चार दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या रशीद अन्सारी,अमजद अन्सारी,मोहम्मद अन्सारी आणि मोहम्मद आलम यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. उर्वरीत दोघांवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृर्ती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरू असलेल्या जखमी आणि मृतांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नळीला तडा गेल्याची माहिती असतांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आणि स्वतःसह परिसरातील नागरीकांच्या घरांना आग लागून त्याच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुह्यात भाडेकरूची माहिती लपविल्याप्रकरणी घरमालकाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.