पुणे – येथील सिरम इन्स्टिट्यूटमधील इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्लँटमध्ये असलेल्या एका इमारतीला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. या इमारतीचे काम सुरू होते. त्याचवेळी वेल्डींग स्पार्कमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमनच्या १० ते १२ बंबांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे २ ते ३ तासात आग आटोक्यात आली. मात्र, या दुर्घटनेत ५ जणांचा बळी गेल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. कोरोना लस निर्मिती होणारा प्रकल्प सुरक्षित असल्याचे यापूर्वीच सिरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांचा तातडीने दौरा
मुंबई – सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटला लागलेल्या आगीसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अदर पुनावाला यांच्याशी बोलले असून उद्या शुक्रवार, २२ जानेवारी रोजी दुपारी पुणे येथे आग लागलेल्या युनिटला भेट देऊन पाहणी करणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील. साडेतीनच्या सुमारास हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील व पाहणी करतील.
https://twitter.com/adarpoonawalla/status/1352231384694177792