पुणे – भारतासह मध्यम व कमी उत्पन्न असलेल्या जगातील एकूण ९२ देशांना अवघ्या २२५ रुपयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे. बील व मिलिंडा गेटस यांच्या गेटस फाऊंडेशनने घेतलेल्या पुढाकारामुळे हे शक्य होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटने गेटस फाऊंडेशन आणि जीएव्हीआय या आंतरराष्ट्रीय संस्थांशी करार केला आहे. लसीच्या दहा कोटी डोसची निर्मिती केली जाणार असल्याचे इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे. कोरोनावरील लस तयार करण्याचे काम ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये सध्या सुरू आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. भारतात या लशीचे उत्पादन सीरम मध्ये होणार आहे. भारतातील चाचण्यांना लवकरच सुरुवात होणार आहे. आगामी डिसेंबरपर्यंत लस भारतात उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास सीरमचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी व्यक्त केला आहे.