नवी दिल्ली – जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वतरांगांवर तिरंगा फडकवणारे कर्नल नरेंद्र ‘बुल’ कुमार (८७) यांचे गुरुवारी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून फार मोठी हानी झाल्याचे म्हटले आहे.
कर्नल नरेंद्र यांनी दिलेल्या महितीमुळेच भारतीय लष्कराने १३ एप्रिल १९८४ रोजी ‘ऑपरेशन मेघदूत’ ही मोहीम राबवत सियाचीनवर आपले नियंत्रण कायम ठेवले होते. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या युद्ध क्षेत्रात करण्यात आलेली ही पहिली कारवाई होती.
कर्नल बुल हे असे सैनिक होते, जे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत बनून राहतील, अशा शब्दांत लष्कराने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आज जरी ते नसले तरी साहस, शौर्य आणि समर्पणाचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
१९३३ मध्ये रावळपिंडी येथे जन्म झालेल्या कर्नल नरेंद्र १९५३ मध्ये कुमाऊं रेजिमेंटमध्ये भरती झाले. सियाचीन ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा मनसुबा त्यांना कळताच त्यांनी याबाबतची सगळी माहिती वरिष्ठांना दिली. आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्कराला ऑपरेशन मेघदूत राबवण्याचे आदेश दिले. ज्यामुळे भारताला सियाचीन आपल्या ताब्यात ठेवणे शक्य झाले. कर्नल बुल यांचे तीन भाऊ देखील लष्करातच होते.
नंदादेवी पर्वतावर चढणारे ते पहिले भारतीय होते. याशिवाय माऊंट एव्हरेस्ट आणि कांचनजुंगावरही त्यांनी तिरंगा फडकवला होता. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या मोहिमांमध्ये चार बोटे गमावल्यानंतरही त्यांनी या पर्वतांवर यशस्वी चढाई केली.
त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, आणि कीर्ती चक्र अशा लष्करी तर पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.