सिन्नर- संपूर्ण आशिया खंडात नंबर २ ची सहकारी औद्योगिक वसाहत असा लौकिक कमावलेल्या तालुक्यातील मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या नामकर्ण आवारे यांच्यासह ६ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. संचालक मंडळाच्या १३ पैकी १ जागा आधीच रिक्त असून या राजीनाम्यांमुळे ७ जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे अल्पमतात आलेले संचालक मंडळ बरखास्त केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून संस्थेवर प्रशासक येण्याची चर्चा सुरु झाली आहे.
सन २०१५ मध्ये संस्थेचे माजी सरव्यवस्थापक नामकर्ण आवारे व तत्कालीन आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १३ पैकी ११ जागा जिंकत तत्कालीन चेअरमन दिलीप शिंदे यांची सत्ता हिसकावत परिवर्तन घडवले होते. शिंदे यांच्यासह त्यांच्या पॅनलचे सुनील कुंदे हे निवडून आले होते. पुढे त्यांनी शिंदे यांची साथ सोडत आवारे यांच्या गोटात प्रवेश केला होता. बँकेचे थकबाकीदार झाल्याने दिलीप शिंदे यांचे संचालक पद त्यानंतर रद्द झाले . त्याच दरम्यान नामकर्ण आवारे यांची संचालकपदी वर्णी देखील लागली होती. पहिल्या वर्षी अरुण किसनराव चव्हाणके यांना अनुभवाच्या जोरावर चेअरमनपद देण्यात आले. मात्र, दीड वर्षांनंतर सर्वच संचालकांना चेअरमन पदाची स्वप्न पडू लागली आणि संचालकांमध्ये धुसफुस सुरु झाली. तेव्हा अविनाश तांबे यांच्यावर १ वर्षासाठी चेअरमन पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, मुदत संपल्यानंतरही ४-५ महिने तांबे यांच्याकडून राजीनामा देण्यास चालढकलच करण्यात येत होती. आवारे यांनी सुचविलेल्या कामांना विरोध करण्यापर्यंत तांबे जाऊ लागले. त्यानंतर वाजे यांच्या मध्यस्थीने पंडित लोंढे यांना १ वर्षासाठी चेअरमनपद देण्यात आले. मात्र, त्यांनीही १ वर्षानंतर राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर संचालक मंडळात सरळ दोन गट पडले. कुंदे यांनी आवारे यांच्या पारड्यात वजन टाकल्याने आवारे यांच्यासोबत ७ संचालक तर लोंढे-तांबे यांच्यासोबत ४ संचालक राहिले तर किशोर देशमुख यांनी दोन्ही गटापासून दूर राहत स्वतःचे अस्तित्व वेगळे ठेवले. चेअरमन लोंढे असले तरी आवारे यांच्या गटाकडे बहुमत राहिले.
संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट २०२० मध्येच संपली. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक लांबत गेली. कोरोनाच्या काळात वसाहतीतील काही उद्योजकांसह कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतरही सत्ताधाऱ्यांकडून उपाययोजना करणारी कुठलीही पावले उचलली न गेल्याने व मनासारखे काम करता येत नसल्याने आवारे यांच्यासह अरुण चव्हाणके, प्रभाकर बडगुजर, पद्मा सारडा, चिंतामण पगारे, संदीप आवारे या संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे व्यवस्थापक कमलाकर पोटे यांच्याकडे सुपूर्द केले असून सुनील कुंदे यांनी लोंढे-तांबे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने लोंढे-तांबे-कुंदे, रामदास दराडे, मिनाक्षी दळवी व दोन्हीही गटाशी संबंध तोडलेले किशोर देशमुख असे ६ संचालक आता शिल्लक राहिले आहेत. ६ संचालकांचे राजीनामे पोटे यांनी सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्ष यांच्याकडे पाठवले असून ते त्यावर एक-दोन दिवसात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
संचालक मंडळातील १३ पैकी ७ जागा रिक्त झाल्याने सत्ताधारी अल्पमतात आले असून हे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय रुद्राक्ष घेऊ शकतात अशी चर्चा सहकार क्षेत्रातील जाणकार करत आहेत.