सिन्नर – नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर येथील प्राथमिक विद्या मंदिर, सरदवाडी. शाळेत एका अनोख्या पद्धतीने बाल महोत्सवास ऑनलाइन प्रारंभ झाला. सध्या कोविड प्रादुर्भावामुळे बाल वयातील विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही, बाल महोत्सवातील मौज-मजा आनंदापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी होत असलेल्या बाल महोत्सवाचा आनंद घरुनच विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न शाळेने केला.
यासाठी शाळेमध्ये बालकांच्या संपूर्ण विकासासाठी आवश्यक असलेल्या १२ व्यवस्थांचे प्रदर्शन भरविण्यात आले व ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत त्याची माहिती पोचविण्यात आली .बारा व्यवस्थांमध्ये घर, स्वयंपाक घर,बगीच्या ,कला शाळा ,कार्यशाळा ,रंगमंच, क्रीडांगण ,पोहण्याचा तलाव, प्रदर्शन दालन, विज्ञान प्रयोगशाळा ,चित्र पुस्तकालय, प्राणी पक्षी संग्रहालय , वस्तुसंग्रहालय अशा बारा अवस्थांचे प्रदर्शन भरवून त्याची माहिती पालकांना व बालकांना देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
बालकांसाठी आयोजित तीन दिवसीय स्पर्धांमध्ये बाल गीत गायन,कथाकथन तसेच स्तोत्र पाठांतर अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, पालक आपल्या बालकांचा व्हिडिओ तयार करून, शाळेच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठविणार आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांसाठीही कोविड कालावधीमध्ये शाळा बंद योग्य की अयोग्य ,कोविड कालावधीमध्ये येणाऱ्या शारीरिक आर्थिक व मानसिक समस्या या विषयांवर निबंधस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बाल महोत्सवाचे उद्घाटन शाळेचे अधीक्षक व कार्यकारी मंडळाचे सदस्य राहुल मुळे व मुख्याध्यापिका सुरेखा जेजुरकर यांचे शुभहस्ते विद्याभारतीच्या प्रार्थनेने, सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून संपन्न झाले. याप्रसंगी ऑनलाइन पद्धतीने गुगल मिटचे माध्यमातून पालक वर्ग व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राथमिक व बालक मंदिरातील शिक्षक उपस्थित होते. शालेय समिती अध्यक्ष मंगेश कुलकर्णी यांचे बाल महोत्सवाच्या आयोजनात मोलाचे मार्गदर्शन केले. बाल महोत्सवाच्या यशस्वितेसाठी बालक मंदिर शिक्षिका अनुपमा रसाळ ,वंदना साबळे, हंसा कुलकर्णी, शीला डावरे,कला शिक्षिका प्रीती पवार ,सायली मालपाठक, कदम मॅडम ,अंकिता गुजराथी परिश्रम घेत आहेत.