सिन्नर – शेतकरी ते थेट ग्राहक सेवा बाजारतळ ही पुणे,मुंबई सारख्या शहरांत राबविली जाणारी संकल्पना नाशिक जिल्ह्यात प्रथमच सोमठाणे गावात राबविली जात आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नांतून ३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंजूर झालेला हा प्रकल्प २ एकरांत उभा राहत असून त्याद्वारे शेतकरी व ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.
आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना व तो खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पुरेशा सुविधा मिळत नाही.पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ग्राहक आता शहरांतील बाजारांत अथवा मॉल मध्ये भाजीपाला अथवा अन्य वस्तू खरेदी करण्यास जातो.परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना आपला भाजीपाला पुरेशा ग्राहकवर्गाअभावी व्यापाऱ्याला मातीमोल किमतीत विकावा लागतो.दुसऱ्या बाजूला ग्राहकालाही हा भाजीपाला व्यापाऱ्यांकडून घ्यावा लागत असल्याने त्याची प्रमाणापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते.त्यामुळे नुकसान होते ते शेतकरी व ग्राहकाचे.अशा प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या सोमठाणे या स्वतःच्या गावी शेतकरी ते थेट ग्राहक सेवा बाजारतळ उभारणी करण्याचे ठरवले.
मात्र सध्या आठवडी बाजारतळांसाठी पणन विभागाकडून जो निधी मिळतो,त्यात हे काम होणार नाही,ही बाब हेरून आमदार कोकाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाकडून या कामास निधी देण्याची मागणी केली.त्यानुसार नियोजन विभागाने जिल्हा नियोजन समिती यांना हे काम मंजूर करण्याचे आदेश केले.त्यानुसार आमदार कोकाटे यांच्या सूचनेनुसार सदर कामाचा प्रस्ताव नाविन्यपूर्ण योजनेत दाखल करण्यात आला.या प्रस्तावास जिल्हाधिकारी नाशिक यांनी नुकतीच मंजुरी दिली असून त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये निधीही मंजूर करण्यात आला आहे.सदर काम मंजूर होण्यासाठी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी सहकार्य केले.
शेतकरी व ग्राहकांचा फायदा…..
यामुळे शेतकरी तसेच ग्रामीण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजार पेठ उपलब्ध होईल.सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून शक्य होणार आहे.या ठिकाणी मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांस उपलब्ध होणार आहे.शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याकारणाने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.शंभर टक्के रोखीने व्यवहार या ठिकाणी होणार असून कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही.ग्रामीण भागातील युवकांना चांगल्या अर्थार्जनाचा रोजगार उपलब्ध होणार आहे.शिवाय वाजवी भावामध्ये ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध होणार आहे.ग्राहकांना ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध होईल.शेतकरी स्वतः विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रती बाबत ग्राहकांना खात्री बाळगता येईल.थेट शेतकऱ्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकऱ्याला सांगू शकतील.थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान मिळणार आहे.एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दुध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामिण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांची वेळ व पैसा वाचून त्यांना उत्तम दर्जाचा माल मिळणार आहे.
२ एकर जागेत बाजारतळाची होणार उभारणी..
सोमठाणे हे निफाड, कोपरगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेले गाव.दर शनिवारी या ठिकाणी आठवडी बाजार भरतो.या ठिकाणी आमदार कोकाटे यांच्या मार्फत मूलभूत सुविधा देण्याची कामे झाली आहेत.आता या ठिकाणी संपूर्ण बाजारतळ हे बंदिस्त राहणार असून त्यामुळे हिवाळा,उन्हाळा व पावसाळा या कोणत्याही ऋतूंचा यावर परिणाम होणार नाही.परिसर हा पूर्णतः बागायती असून त्यामुळे शेतकरी दररोज ताजा भाजीपाला या ठिकाणी विक्रीसाठी आणू शकणार आहेत.सिन्नर तालुक्याप्रमाणेच निफाड,कोपरगाव तालुक्यातील शेतकरी व ग्राहक या ठिकाणी खरेदी-विक्री करू शकणार आहेत.
शेतकरी हितासाठी या बाजारतळाची निर्मिती…
शेतकऱ्यांना पिकविता येते.मात्र विक्रीचे कौशल्य त्याच्याजवळ नसते.त्यामुळे शेतकरी ते थेट ग्राहकसेवा बाजारातळाची संकल्पना मनामध्ये आली.शासन स्तरावर दाखल असलेला प्रकल्प मंजूर झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे हित साधले जाणार आहे.ग्राहकांनाही शेतकऱ्यांकडील ताजा भाजीपाला व अन्य वस्तू थेट खरेदी करता येणार आहे.
माणिकराव कोकाटे, आमदार सिन्नर