सिन्नर- बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या सिन्नर पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाण्याला स्वतःची हक्काची इमारत मिळणार असून उद्या (दि. १३) मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता या दोन्ही पोलीस ठाण्यांचा भूमिपुजन सोहळा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या दोन्ही इमारतींसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी ५ कोटी ६९ लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे.
सिन्नर पोलीस ठाणे ब्रिटिश काळापासून स्वतःच्या इमारतीमध्ये कार्यरत होते. मात्र, तहसीलच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी पोलीस ठाणे पाडण्यात आले आणि तेव्हापासून हे पोलीस ठाणे जुन्या तहसीलच्या छोट्या जागेत कार्यरत होते. ही जागा अधिकारी व पोलीस कर्मचार्यांना बसण्यासही अपुरी पडत होती. सिन्नर व वावी पोलीस ठाण्याचे विभाजन करून एमआयडीसी पोलीस ठाण्याची काही वर्षांपूर्वी निर्मिती करण्यात आली. मुसळगाव एमआयडीसीच्या व्यापारी संकुलात हे पोलीस ठाणे कार्यरत आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायगावपासून सोमठाण्यापर्यंतचे अनेक गावे येतात. या गावातील सर्वांसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहचणे अवघड होत होते. सर्वाना सोयीस्कर व्हावे यासाठी हे पोलीस ठाणे सिन्नर शहरात व्हावे अशी मागणी स्थापनेपासून होत होती. या सर्व बाबींचा विचार करून आता या दोन्ही पोलीस ठाण्यांना स्वतःची हक्काची इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाजवळील मोकळ्या भूखंडावर दोन्ही पोलीस ठाण्याच्या इमारती शेजारी-शेजारी उभ्या राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने हा भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ह्या सोहळ्यास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधिक्षका शर्मिष्ठा घारगे-वालावकर, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, एमआयडीसी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व दोन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.